News Flash

शास्त्रोक्त कचरा विल्हेवाट प्रकल्पाला विरोध

कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारण्यास टाळाटाळ करणाऱ्या महापालिकेला उच्च न्यायालयाने दणका दिला आहे.

  कचरा विल्हेवाट प्रकल्पाविरोधात बारावे नागरिकांच्या मोर्चामध्ये महिलांचाही लक्षणीय सहभाग होता. 

प्रकल्प हटविण्यासाठी बारावेवासीयांचा कडोंमपावर मोर्चा; न्यायालयात जाण्याचा इशारा

कल्याण पश्चिमेतील बारावे परिसरात नव्याने गृहसंकुले उभी राहिली आहेत. मोकळ्या हवेतील निवांत, निसर्गरम्य भाग म्हणून विविध भागांतून रहिवासी या संकुलांमध्ये राहावयास आली आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेने या भागात कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचा प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरू केल्याने या भागातील रहिवासी कमालीचे अस्वस्थ झाले असून आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. हा प्रकल्प अन्य भागांत सुरू करण्यात यावा, अशी मागणी करीत बारावे परिसरातील सुमारे ६५ गृहसंकुलांमधील रहिवाशांनी बुधवारी कल्याण-डोंबिवली पालिका मुख्यालयावर मोर्चा काढला.

कचरा विल्हेवाट प्रकल्प उभारण्यास टाळाटाळ करणाऱ्या महापालिकेला उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. जोपर्यंत महापालिका कचरा क्षेपणभूमीचा प्रकल्प उभा करत नाही, तोवर महापालिका हद्दीत एकाही बांधकामाला परवानगी द्यायची नाही, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या आदेशामुळे महापालिकेचे मोठय़ा प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच विकासकामांमध्येही अस्वस्थता आहे. त्यामुळे महापालिकेने घाईघाईने आधारवाडी क्षेपणभूमी बंद करण्यासंबंधी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. तसेच बारावे, उंबर्डे, मांडा येथे कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे प्रकल्प उभे राहावेत यासाठी आराखडे तयार करण्यास सुरुवात केली आहे.

बारावे येथे क्षेपणभूमीसाठी आरक्षित जागा आहे. महापालिकेने याठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावता येईल अशी क्षेपणभूमी उभारण्याची तयारी केली आहे. ही आरक्षित जमीन अनेक वर्षे पडीक होती. त्यामुळे विकासकांनी बारावे या मोकळ्या परिसरात गगनचुंबी गृहसंकुले उभी केली आहेत. मुंबई परिसरातील घुसमटीला कंटाळलेला बहुतांशी मध्यमवर्ग या भागात कायमचा निवासासाठी आला आहे. येथील काही रहिवासी मुंबईमधील शासकीय कार्यालये, खासगी आस्थापनांमध्ये उच्चपदावर कार्यरत आहेत. मोकळ्या वातावरणात राहण्यास येऊन काही वर्षे लोटत नाहीत तोच महापालिकेने क्षेपणभूमीचा प्रस्ताव पुढे रेटल्याने येथील रहिवाशांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. नागरी वस्तीपासून बारावे क्षेपणभूमी जेमतेम ५० मीटर अंतरावर आहे, असा या भागातील रहिवाशांचा आक्षेप आहे. सुरुवातीला पालिकेने आम्ही प्रकल्प योग्यरीतीने हाताळतो, कचऱ्याची दरुगधी येणार नाही, असे चित्र उभे केले असले तरी त्यावर रहिवाशांचा विश्वास नाही. आधारवाडी क्षेपणभूमीची काय वाताहत झाली हे तेथील रहिवाशांनी अनुभवले आहे. ओला, सुका कचरा ही संकल्पना प्रत्यक्ष कृतीत येणे खूप अवघड आहे. त्यामुळे याठिकाणी क्षेपणभूमी नकोच, अशी भूमिका रहिवाशांनी घेतली आहे.

या प्रकल्पाच्या उभारण्यासाठी पर्यावरण विभागाच्या परवानग्या घेणे आवश्यक आहे. रहिवाशांची भूमिका जाणून घेणे आवश्यक होते. तसे काहीही न करता पालिकेने ही कृती केली आहे, असा रहिवाशांचा आरोप आहे. प्रसंगी न्यायालयात याप्रकरणी दाद मागण्यात येईल, असे या भागातील एक रहिवासी राहुल सूर्यवंशी यांनी सांगितले. गोदरेज हिल, खडकपाडा भागातून मोर्चा पालिकेवर आणण्यात आला. मोर्चामुळे पालिकेबाहेर बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान, बारावे येथे क्षेपणभूमीचे विकास आराखडय़ात आरक्षण आहे. सर्व प्रकारच्या परवानग्या मिळाल्या आहेत. यापूर्वी नियोजन न केल्यामुळे कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला. यापुढे प्रत्येक रहिवाशाने कचरा ही संपत्ती म्हणून पाहण्याची गरज आहे. या प्रकल्पातून कोणत्याही प्रकारचा कचरा, दरुगधी येणार नाही, अशा पद्धतीने हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे, असे पालिका अधिकाऱ्याने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2016 2:02 am

Web Title: opposing to scientific waste disposal plant in kalyan
टॅग : Kalyan
Next Stories
1 जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलींना ‘त्या’ दिवसांत दिलासा
2 महाशिवरात्री दिवशी तरुणांची अनोखी श्रद्धा
3 अक्षय मोगरकरला ‘ठाणे श्री’चा किताब
Just Now!
X