१६ पैकी ८ मार्गावर बस नसल्याने प्रवाशांना मनस्ताप
भाईंदर : मागील महिन्यात मीरा-भाईंदर महानगरपालिकेची परिवहन सेवा सुरू करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाकडून घेण्यात आला होता. परंतु अद्यापही ही परिवहन सेवा सुरळीत सुरू झाली नसून १६ पैकी केवळ ८ मार्गावर धावत असल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
करोनाच्या संकटामुळे मीरा-भाईंदर महानगरपालिकेची परिवहन सेवा बंद ठेवण्यात आली होती. टाळेबंदी शिथिल करण्यास सुरुवात केल्यानंतर ठेकेदाराला शासनाच्या आदेशानुसार ५०% क्षमतेने परिवहन सेवा सुरू करण्याचा पहिला आदेश १९ जून रोजी पालिकेमार्फत देण्यात आला होता. मात्र ठेकेदाराने परिवहन सेवा सुरू केली नाही. महापालिकेने ठेकेदाराला १५ वेळेस लेखी पत्र काढून परिवहन सेवा सुरू करण्याचे आदेश दिले होते परंतु तरीदेखील त्याने कोणतीही कार्यवाही केली नसल्याने अखेर मनपा आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी ६ ऑक्टोबर रोजी ठेका रद्द केला.
त्यानंतर भागीरथी ट्रान्सपोर्ट या ठेकेदाराने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत ठेका रद्द करण्यास स्थगिती मिळावी व कर्मचारी आगाराबाहेर आंदोलन करत असल्याने बस आगाराबाहेर सुरक्षित काढण्यासाठी पोलीस संरक्षण मिळावे यासाठी याचिका दाखल केली होती. यावर १५ ऑक्टोबर रोजी उच्च न्यायालयाने मनपा आयुक्तांना बस सुरू करण्यास पोलीस संरक्षण देण्याच्या सूचना होत्या. मात्र त्यानंतर मनपा आयुक्त डॉ. विजय राठोड, ठेकेदार, कर्मचारी व पोलीस प्रशासनाची संयुक्त बैठक आयोजित करून १६ ऑक्टोबर रोजीपासून काही मार्गावर बस सेवा सुरू करण्यात आली.
त्यानंतर ठेकेदाराने टप्प्याटप्प्याने शहरात आठ मार्गावर २१ बस उपलब्ध करून दिल्या परंतु पालिकेची परिवहन सेवा पूर्वी १६ मार्गावर चालवली जात होती. ती सध्या केवळ आठ मार्गावर चालवली जात असल्याने काही परिसरात बस उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. तसेच २१ बस धावत असल्यामुळे मध्ये मर्यादितच कर्मचाऱ्यांना काम मिळत असल्याने इतरही कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे महापालिका आठवडय़ाभरात नागरिकांचा परिवहन सेवेला कशा प्रकारे प्रतिसाद मिळतोय हे पाहून उर्वरित मार्गावर पूर्ण क्षमतेने ७० बस उपलब्ध करून देणार आहे.
येत्या दिवसात बस संख्येत वाढ करण्यात येणार असून लवकरच सर्व मार्गावर बस चालू करण्यात येणार आहे.
– अजित मुठे, उपायुक्त, मीरा-भाईंदर महानगरपालिका