अ‍ॅप्लिकेशनचा हेल्पलाईन क्रमांक संपर्काबाहेर

आशीष धनगर, लोकसत्ता

ठाणे : लांबलचक रांगा टाळून मोबाईल फोनवर अगदी सेकंदात तिकिट मिळवण्यासाठी तयार करण्यात आलेले यूटीएस अ‍ॅप्लिकेशन गेल्या काही दिवसांपासून रेल्वे प्रवाशांना डोकेदुखी ठरत आहे. एटीव्हीएम मशीनवर काढलेल्या तिकीटाची प्रत मिळण्यात येणाऱ्या अडचणी, खात्यावरुन पैशांची कपात होऊनही पास न मिळणे आणि अनेकदा लॉग ईन होताना येत असलेले अडथळे अशा समस्यांमुळे रेल्वेची ही बहुचर्चित ऑनलाईन व्यवस्था तक्रारींचे कारण ठरु लागली आहे. युटीएस यंत्रणेविषयीच्या तक्रारी घेऊन प्रवाशांचे जथ्थे सध्या तिकीट खिडक्यांवर रांगा लावताना दिसत असून ही यंत्रणा म्हणजे विकतचे दुखणे असल्याची टिका होऊ लागली आहे.

उपनगरीय रेल्वेने प्रवास करताना प्रवाशांचा तिकीट काढण्यासाठीचा वेळ वचावा या उद्देशाने रेल्वे प्रशासनाच्या क्रिस विभागातर्फे चार वर्षांपूर्वी यूटीएस अ‍ॅप्लिकेशनची निर्मिती करण्यात आली आहे. या मोबाईल अ‍ॅप्लिकेशनने प्रवाशांना अगदी काही सेकंदात तिकीट काढणे शक्य होत असून मासिक पासही या माध्यमातून काढत येतो. त्यामुळे अल्पावधीतच यूटीएस अ‍ॅप्लिकेशन लोकप्रिय ठरु लागले होते. या अ‍ॅप्लिकेशनच्या सहाय्याने दररोज ४० ते ४५ हजार प्रवासी तिकीट काढत असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. असे असले तरी गेल्या काही दिवसांपासून ही यंत्रणा उपयोगात आणताना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अ‍ॅप्लिेकशनच्या माध्यमातून तिकीट आणि पास काढताना अनेकदा वापरकर्त्यांच्या खात्यातून पैशांची कपात होते, मात्र तिकीट आणि पास मिळण्यास अडथळा निर्माण होत आहे. तर, यूटीएस अ‍ॅप्लिकेशनवर काढलेल्या तिकीटांची एटिव्हीएम मशीनमधून प्रत काढतानाही अडचणी येत आहेत. अनेकदा रेल्वे स्थानकावर तिकीट तपासनिसांकडून तिकीटाची आणि पासची तपासनी केली जाते. ऐन वेळी या अ‍ॅप्लिेकशनचे लॉग इन करतानाही समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळा वाचवा या उद्देशाने तयार करण्यात आलेले हे अ‍ॅप्लिकेशन अधिक वेळखाऊ बनत असल्याच्या संतप्त प्रतिक्रीया उमटू लागल्या आहेत. अशा विविध अडचणी सोडविण्यासाठी प्रवाशांना प्रवास सोडून स्थानकातील तिकीट खिडक्या गाठाव्या लागत आहेत. गेल्या आठ दिवसांपासून दररोज मध्य रेल्वेच्या ठाणे, डोंबिवली, दिवा, कल्याण या स्थानकातील तिकीट खिडक्याजवळ वापरकर्त्यां प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे. तसेच अनेकदा रेल्वे कर्मचाऱ्यांकडून अडचणी सोडवण्यासाठी सहकार्यही मिळत नसल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे नाराज प्रवासी त्यांच्या संतापजनक प्रतिक्रीया गुगल प्लेस्टोरवर नोंदवत असून यूटीएस अ‍ॅप्लिकेशनवर गेल्या आठ दिवसांपासून नकरात्मक प्रतिक्रीयांची भर पडली आहे.

हेल्पलाईन क्रमांक संपर्काबाहेर यूटीएस अ‍ॅप्लिकेशनबाबत प्रवाशांना येणाऱ्या तक्रारी सोडविण्यासाठी रेल्वे प्रशासनातर्फे ‘१३९’ हा हेल्पलाईन क्रमांक देण्यात आला आहे. मात्र, हा क्रमांक संपर्कबाहेर असून अनेकदा फोन उचललाही जात नसल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे.

यूटीएस अ‍ॅप्लिकेशनचे वापरकर्ते वाढले असून गर्दीच्या वेळी अ‍ॅप्लिकेशनच्या नेटवर्कवर वापरकर्त्यांची संख्या वाढते आहे. त्यामुळे नेटवर्कमध्ये अडथळा निर्माण होत असून विविध समस्या येत आहेत. मात्र लवकरच अ‍ॅप्लिकेशनचे नेटवर्क वाढवले जाणार आहे.

– कार्तिकेय सिंग, महाव्यवस्थापक,  क्रिस