11 December 2017

News Flash

रेल्वे प्रशासनही ढिम्म

कामाच्या दिरंगाईमुळे प्रवाशांना अजूनही आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.

Updated: August 12, 2017 2:38 AM

ठाकुर्लीतील पादचारी पुलाचे काम सुरूच

सायली रावराणे

अनेक वर्षे नाइलाजाने रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या ठाकुर्ली स्थानकातील प्रवाशांनी रेल्वे पादचारी पुलाचे बांधकाम सुरू झाल्यावर सुटकेचा नि:श्वास सोडला असला तरीही कामाच्या दिरंगाईमुळे प्रवाशांना अजूनही आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. लवकरच होणाऱ्या रेल्वे टर्मिनसमुळे सध्या ठाकुर्ली स्थानक चर्चेत असले तरी सध्या मात्र येथील प्रवासी दररोज आपला जीव मुठीत घेऊन रेल्वे रूळ ओलांडताना दिसत आहेत. ठाकुर्ली स्थानकात डोंबिवली दिशेला रेल्वेचा पूल असूनही प्रवासी खुलेआम रेल्वे रूळ ओलांडतात. कल्याण दिशेला असलेल्या रेल्वे पुलाचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्यामुळे प्रवासी स्थानकातून बाहेर पडण्यासाठी पूर्व दिशेकडील ‘स्टेशन व्ह्य़ू’ या इमारतीजवळून जाण्याऱ्या मार्गाचा वापर करतात. अनेक प्रवासी याच मार्गाच्या पुढे असलेल्या कल्याण दिशेकडील म्हसोबा चौक येथे पोहोचवण्याऱ्या मार्गाने जाताना दिसतात.

पळवाटांनी घेरलेले कोपर

सायली रावराणे

दिवा ते वसई-डहाणू ही स्थानके जोडणारी दिवा-वसई ही शटल सेवा सुरू झाल्यापासून कोपर स्थानकाजवळ रूळ ओलांडणाऱ्यांची संख्या अधिक आहे. काही वर्षांपूर्वी कोपर रेल्वे स्थानकात पादचारी पूल नव्हता. त्यामुळे रूळ ओलांडण्याशिवाय प्रवाशांना अन्य पर्याय नव्हता. मात्र काही वर्षांपूर्वी कोपर रेल्वे स्थानकात पादचारी पूल बांधण्यात आला. मात्र तरीही प्रवासी रूळ ओलांडण्याचा धोका पत्करतात.

कोपर पश्चिमेला जाण्यासाठी स्थानकातून अनेक वाटा आहेत. ठाणे दिशेला असलेली वाट प्रवाशांना थेट कोपर गाव येथे पोहोचवते. कल्याण दिशेला असलेले मार्ग वापरण्यासाठी मात्र प्रवाशांना कसरत करावी लागते. अनेक नागरिक तिकीट घराखाली असलेल्या कुंपणावरून उडय़ा मारून जाताना दिसतात. त्याच मार्गावरून थोडे पुढे गेल्यास डाव्या बाजूला असलेली एक छोटीशी वाट प्रवाशांना थेट स्थानकात पोहोचवते. कोपर स्थानकाच्या पूर्व दिशेला असलेल्या बेकायदा चाळींमुळे प्रवाशांसाठी रूळ ओलांडण्याच्या अनेक चोरवाटा खुल्या झाल्या आहेत. प्रवासी कुणाचीही भीती न बाळगता या वाटांचा वापर करताना दिसतात.

वाटेवर पेव्हर ब्लॉक

रेल्वे रूळ ओलांडताना होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी व्हावे म्हणून रेल्वे स्थानकांजवळील अशा चोरवाटा बंद करण्याचे प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून सुरू असताना याच चोरवाटांच्या मार्गावर पेव्हर ब्लॉकस् टाकून ते व्यवस्थित करण्याचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे, रेल्वेच्या जागेत हे काम सुरू असले तरी, याकडे रेल्वे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. स्थानकात ठाण्याच्या दिशेला पश्चिम भागात राजकीय कार्यकर्त्यांनी चोरवाटांवर पेव्हर ब्लॉक टाकले आहेत. त्यामुळे या वाटेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढली आहे.पूर्वी प्रवासी या वाटेने ये-जा होतीच, पेव्हर ब्लॉक टाकून आम्ही त्यांच्यासाठी सोय केली आहे,’ असे भाजपचे कार्यकर्ते पवन पाटील म्हणाले.

अंबरनाथ, बदलापूर येथेही चोरवाटांवर गजबज

सागर नरेकर, अंबरनाथ

रेल्वे प्रशासन विविध प्रकारच्या सुविधा देत असले तरी प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे अंबरनाथ आणि बदलापूर दोन्ही रेल्वे स्थानकांमध्ये सध्या अभूतपूर्व कोंडी होत आहे. त्यामुळे दोन्ही शहरांतील प्रवाशांनी स्थानकात ये-जा करण्यासाठी चोरवाटा शोधल्या आहेत. त्यामुळे अपघातांचे आणि त्यात मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे.

बदलापूर रेल्वे स्थानकाचे भौगोलिक स्थान वळणाचे असल्याने येथे स्थानकावरील फलांटांची रुंदी आणि लांबी वाढवण्यात अडचणी येत आहेत. फलाट क्रमांक एक आणि दोनवर प्रवाशांची सर्वाधिक गर्दी असते. सायंकाळी मुंबईहून येणाऱ्या आणि बदलापूर किंवा कर्जत येथे जाणाऱ्या सर्वच लोकल गाडय़ा या दोन नंबरच्या फलाटावर थांबत असतात. त्यामुळे येथे लोकल आल्यानंतर मोठी गर्दी होत असते. त्यात या फलाटावरील पादचारी पूल लहान असल्याने पंधरा ते वीस मिनिटे स्थानकाबाहेर पडण्यासाठी लागतात. त्यामुळे अनेकदा रेल्वे प्रवासी रूळ ओलांडून स्थानकाबाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतात. फलाट क्रमांक एकच्या बाजूला त्यासाठी चोरवाटाही तयार करण्यात आल्या आहेत. वर्षभरापूर्वी येथे रेल्वेतर्फे लोखंडी जाळ्या लावण्यात आल्या होत्या. मात्र त्याच्या बाजूने मार्ग काढण्यात प्रवाशांनी यश मिळवले आहे. तसेच पश्चिमेकडील रमेशवाडीकडे जाणारे प्रवासी कर्जतच्या दिशेने रुळावरून चालत जात बाहेर पडत असतात. पूर्वेलाही मासळी बाजाराच्या बाजूने हे प्रवासी निघत असतात. त्यामुळे येथेही रुळावर सायंकाळी मोठी गर्दी पाहायला मिळते. येथेच रेल्वे रुळांना वळण असल्याने जवळ आलेली लोकल सहसा दृष्टीस पडत नाही. त्यामुळे येथे सर्वाधिक अपघात होऊन रेल्वे प्रवाशांना जीव गमवावा लागतो. येथे गेल्या अनेक वर्षांपासून पादचारी पूल उभारावा अशी प्रवाशांची मागणी आहे. तसेच होम प्लॅटफॉर्मही प्रस्तावित आहे. मात्र त्यावरही ठोस काही होत नसल्याने प्रवासी नाइलाजाने या चोरवाटांचा मार्ग अवलंबतात, असे रेल्वे प्रवासी संघटनेकडून सांगितले जाते.

वांगणीत प्रवासी सुरक्षा लोकलखाली

प्रतिनिधी, बदलापूर

वांगणी रेल्वे स्थानकातील पुलाअभावी अनेक प्रवासी, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना धोक्याची वाट पत्करावी लागत आहे. त्यामुळे तातडीने हा पूल करावा अशी मागणी वांगणीकर करीत आहेत.

बदलापूरनंतर झपाटय़ाने वाढणाऱ्या वांगणीची वाटचाल शहराकडे होत आहे. त्यात चाकरमान्यांची संख्या वाढल्याने लोकलची गर्दी वाढली आहे. प्रवाशांसोबत रेल्वे स्थानकाचे उत्पन्नही वाढले आहे. मात्र त्या तुलनेत स्थानकात रेल्वेतर्फे सुविधा देण्यात येत नसल्याचा आरोप रेल्वे प्रवासी करीत आहेत. वांगणी रेल्वे स्थानकात बदलापूरच्या दिशेने एकच पादचारी पूल आहे. मात्र कर्जतच्या दिशेला उतरणाऱ्या रेल्वे प्रवाशांची संख्या मोठी आहे. तसेच वांगणीतून बाहेर जाणारे विद्यार्थी आणि वांगणीत येणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे.  अनेकदा वांगणी यार्डात उभ्या असलेल्या रेल्वे गाडय़ांखालून जीवघेणा प्रवास करीत हे पादचारी रूळ ओलांडून जीव धोक्यात घालीत आहेत.

वांगणी रेल्वे स्थानकात कर्जतच्या दिशेने रेल्वे पादचारी पूल प्रस्तावित आहे का, याबाबत रेल्वे मंत्रालयाकडे विचारणा केली होती. मात्र तसा कोणताही प्रस्ताव नसल्याचे कळते आहे. मात्र नागरिकांच्या सोयीसाठी हा पूल होणे आवश्यक असून त्यासाठी केलेल्या स्वाक्षरी मोहिमेस मोठा प्रतिसाद लाभला आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

विजय गायकवाड, सनराईज सामाजिक विकास संस्था.

 

अंधांचाही धोकादायक प्रवास

वांगणीत अंधांची मोठी वसाहत आहे. वांगणीच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी हे अंध बांधव रूळ ओलांडत असतात. त्यामुळे त्यांच्या जिवालाही धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे किमान त्यांच्यासाठी तरी पुलाचा विचार व्हावा, अशी मागणी पुढे येते आहे.

कल्याणात बाजाराची वाट रुळाकडे

देशातील एक महत्त्वाचे जंक्शन रेल्वे स्थानक अशी ख्याती असलेल्या कल्याण स्थानकातही अनेक चोरवाटा आहेत. कल्याण पश्चिम येथील बाजारपेठेतून जाणारा एक रस्ता थेट रेल्वे रुळाला येऊन मिळतो. इथून येणे-जाणे सोपे पडत असल्याने प्रवासी या मार्गावरून ये-जा करतात. तसेच इथे रेल्वेचे पार्सल पोहोचविण्यासाठी थेट रुळाकडे एक रस्ता जातो. या रस्त्यावरूनही प्रवासी प्रवास करतात.

पुलाअभावी दिवेकरांची कसरत

दिवा शहराची लोकसंख्या गेल्या काही वर्षांत झपाटय़ाने वाढत आहे. त्यात कोकण रेल्वे, वसई, डहाणू शटलमुळे प्रवाशांची वर्दळ वाढली आहे. मात्र दिवा स्थानकातील एकमेव पादचारी पूल अपुरा आणि गैरसोयीचा ठरत असल्याने प्रवाशांनी चोरवाटांचा मार्ग पत्करला आहे. पुलावर असलेले गर्दुल्ले आणि भिकाऱ्यांमुळेही अनेक जण पुलाचा वापर करणे टाळतात. दिव्याहून मुंब्य्राकडे जाताना पूर्वेकडे दिव्यातील काही ग्रामस्थांच्या शेतजमिनी आहेत. मात्र तिथे जाण्यासाठी रेल्वे रुळांशिवाय अन्य वाट नाही.

डोंबिवलीकरांना पुलावरून जाण्याचा कंटाळा

भाग्यश्री प्रधान

डोंबिवली स्थानकात मुंबईहून धिम्या गाडीने येणाऱ्या पश्चिम विभागातील प्रवाशांना पादचारी पुलाची आवश्यकता नसते. ते सरळ स्थानकाबाहेर पडतात. मात्र पूर्वेकडे जाणाऱ्या प्रवाशांना पुलाचा वापर करावा लागतो. पूल चढण्याचा कंटाळा किंवा वेळ वाचावा म्हणून काही प्रवासी रेल्वे रुळालगतच्या लिखिते इमारतीलगत असलेल्या रस्त्याचा वापर करतात. याशिवाय एका क्लासच्या फलकालगत दुसरी एक चोरवाट आहे. रात्री १० नंतर डोंबिवली पश्चिम आणि पूर्व येथे लावण्यात आलेले सरकते जिने बंद असतात.

कळवा पूर्वेतील चोरवाटा कायम

कळवा स्थानकाच्या पश्चिमेला रूळ ओलांडण्याचे प्रकार रोखण्यासाठी कुंपण घालण्यात आले आहे. मात्र पूर्व दिशेला अशा प्रकारचे कोणतेही कुंपण नसल्याने अनेक जण रेल्वे रूळ ओलांडतात. तसेच पारसिक बोगद्याजवळील भास्करनगर, वाघोबानगर येथील रहिवासीही जलद मार्गावरील रेल्वे रूळ ओलांडताना दिसतात. या ठिकाणी रहिवाशांना रेल्वे रूळ ओलांडता यावे यासाठी भुयारी मार्ग असूनही नागरिकांकडून याचा वापर होत नाही.

First Published on August 12, 2017 2:28 am

Web Title: railway platform issue railway issue railway crossing