|| भगवान मंडलिक

शासनाकडे वर्ग होणारा निधी विकासकामांसाठी वापरण्याची परवानगी

‘महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियाना’तील रस्त्यांच्या कामांसाठी वापरात न आलेली ५० कोटींची रक्कम कल्याण डोंबिवली महापालिकेस आता विविध विकासकामांसाठी वापरता येणार आहे. या रकमेचा योग्य वेळेत वापर केला नसल्याने ती शासनाकडे वर्ग करण्याची वेळ महापालिकेवर आली होती.

आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने विकासकामांवर मर्यादा आल्या असताना तिजोरीत असलेले ५० कोटी रुपये शासनाकडे वर्ग करण्याची नामुष्की महापालिकेवर आली होती, मात्र यासंबंधी महापालिका स्तरावरून वारंवार पाठपुरावा झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या रकमेचा वापर करण्यास हिरवा कंदील दाखविला. यामुळे शहरातील रस्ते तसेच अन्य विकासकामांचा मार्ग प्रशस्त होऊ शकणार आहे.

शासनाच्या नगरविकास विभागाने हिरवा कंदील दाखविल्याने ५० कोटींच्या निधीतून कल्याण, डोंबिवली शहरातील मोजक्या आणि वाहतूक कोंडीने ग्रासलेल्या रस्त्यांच्या रुंदीकरण, सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे प्राधान्याने हाती घेण्यात येतील, अशी माहिती पालिकेतील वरिष्ठ सूत्रांनी ‘लोकसत्ता’ला दिली. ठाकुर्ली स. वा. जोशी शाळेजवळ डोंबिवलीचा पूर्व, पश्चिम भाग जोडणारा उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. येत्या दोन ते तीन वर्षांत माणकोली उड्डाणपूल सुरू झाल्यानंतर ठाकुर्ली पुलावरील वाहनांचा भार वाढणार आहे. त्यामुळे ठाकुर्ली पुलाच्या परिसरातील सारस्वत वसाहत, पेंडसेनगर, नेहरू रस्ता, ठाकुर्ली, चोळेतील वर्दळीच्या मुख्य रस्त्यांचे आणि गल्ल्यांचे रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणाचे काम तातडीने हाती घेण्यात येईल. कल्याण पूर्व, पश्चिम भागांतील काही मोजक्या रस्त्यांचे रुंदीकरण आणि काँक्रिटीकरण करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

अहवाल सादर करण्याचे आदेश

  • सुमारे ५० कोटींचा निधी पालिका तिजोरीत काही महिने पडून होता. हा निधी वेळेत वापरला नाही तर तो शासनाकडे परत पाठवावा लागणार होता. स्थायी समिती सभापती राहुल दामले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन, प्रत्यक्ष भेटून हा ५० कोटींचा निधी पालिकेतील विकासकामांसाठी वापरू देण्याची विनंती केली.
  • मुख्यमंत्र्यांनी तातडीने नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांना ५० कोटींच्या निधीतून पालिका कोणती कामे करू शकते, याची माहिती प्रशासनाकडून मागवून सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते.
  • नगरविकास विभागाने गेल्या आठवडय़ात पालिका आयुक्त गोविंद बोडके यांना पत्र पाठवून ५० कोटींच्या बचत निधीतून पालिका कोणती कामे हाती घेणार आहे, याचा सविस्तर प्रकल्प अहवाल, तांत्रिक मंजुऱ्यांसह शासनाला सादर करण्याचे आदेश दिले आहेत. योग्य ती कामे हाती घेण्यात येतील, असे शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी यांनी सांगितले.

रहिवाशांच्या विरोधामुळे अडथळे

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यासाठी सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानातून पालिकेला सुमारे सातशे ते आठशे कोटी रुपयांचा निधी शासनाने उपलब्ध करून दिला होता. या निधीतून शहरातील २५ हून अधिक रस्त्यांचे रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणाचे काम करण्यात आले. कल्याण तसेच डोंबिवलीतील केळकर रस्ता, मानपाडा रस्ता, पं. दीनदयाळ रस्त्यांचे रुंदीकरण आणि काँक्रिटीकरण करण्यात येणार होते. डोंबिवलीतील रुंदीकरणाच्या कामाला व्यापारी, रहिवाशांकडून विरोध झाला. न्यायालयाने या कामांना स्थगिती दिली. रुंदीकरण न झाल्यामुळे पालिकेला शासनाकडून मिळालेला काही निधी शिल्लक राहिला.

निधीतून पादचारी आणि वाहनचालकांसाठी प्रवास सुखकर होईल अशी रस्ते कामे हाती घेण्यात येणार आहेत. ठाकुर्ली पूल, कल्याणमधील काही महत्त्वाचे वर्दळीचे रस्ते या निधीतून पूर्ण करण्याचा प्रयत्न प्रशासन करणार आहे. या कामाचा सविस्तर आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे.    – सुनील जोशी, प्रकल्प अभियंता, बांधकाम विभाग