लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : सुमारे दोन वर्षांपासून ई-चलानद्वारे करण्यात आलेल्या कारवाईचा प्रलंबित दंड आता वाहनचालकांकडून भरण्यास सुरुवात झालेली आहे. अवघ्या तीन दिवसांत ठाणे वाहतूक शाखेने ९ लाख ७ हजार ६०० रुपये प्रलंबित दंडाची रक्कम वसूल केली आहे. येत्या काही दिवसांत प्रलंबित दंड भरण्यास नागरिक आणखी पुढे येण्याची शक्यता आहे.

भरधाव वाहन चालविणे, सिग्नल ओलांडणे, विनाहेल्मेट दुचाकी चालविणे, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे अशा विविध नियमांचा भंग वाहनचालकांकडून केला जात असतो. हा दंड आकारण्यासाठी ठाणे वाहतूक पोलीस ई-चलान यंत्राद्वारे कारवाई करत असतात. त्यानुसार, १४ फेब्रुवारी २०१९ पासून ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ई-चलानद्वारे दंड आकारण्यात येत आहे.

या ई-चलानची रक्कम भरण्यासाठी वाहनचालक ऑनलाइन पद्धतीनेही दंड भरत असतात. मात्र, अनेक जण त्यांच्या दंडाची रक्कम भरत नाहीत. त्यामुळे ही दंडाची रक्कम वाहनचालकाकडे प्रलंबित असते. दंडाची रक्कम वाढत जाऊन हजारो रुपयांच्या घरात गेल्यास संबंधित वाहनचालक दंड भरण्यास टाळाटाळ करतो. हा प्रलंबित दंड तात्काळ वसूल केला जावा यासाठी काही दिवसांपूर्वीच वाहतूक पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी नागरिकांना १० दिवसांत दंडाची रक्कम ऑनलाइन किंवा पोलिसांकडे भरण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला वाहनचालकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. पोलिसांनी १९ ते २१ ऑक्टोबर या कालावधीत २ हजार ६४९ ई-चलान कारवायांतील प्रलंबित असलेल्या ९ लाख ७ हजार ६०० रुपये दंडाची वसुली केली आहे. अनेक जण स्वत: संपूर्ण प्रलंबित दंड भरण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या चौक्यांमध्ये येत आहेत, तर काही ठिकाणी एखाद्या वाहनचालकाने नियम मोडल्यास त्याला थांबवूनही दंडाची रक्कम भरण्याची विनंती केली जात आहे. या विनंतीनंतर वाहनचालक स्वत:हून दंड भरत असल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे.

वाहतूक पोलिसांनी केलेल्या आवाहनाला नागरिक चांगला प्रतिसाद देत आहे. ज्या वाहनचालकांचे प्रलंबित दंड आहे त्यापैकी अनेकांनी स्वत: पोलिसांकडे येऊन त्यांच्या दंडाची रक्कम भरली आहे. येत्या काळात प्रलंबित दंडवसुलीमध्ये आणखी वाढ होईल.
– बाळासाहेब पाटील, उपायुक्त, ठाणे वाहतूक शाखा