रेल्वे अपघातात बळी पडणाऱ्या वा कायमचे अपंगत्व आलेल्यांची संख्या कमी नाही. अशाप्रकारे प्रवासादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या अथवा जखमी झालेल्यांना डोंबिवलीतील श्री सद्गुरूकृपा सामाजिक व कल्याणकारी संस्था मदतीचा हात पुढे करीत आहे. अपघातग्रस्त नागरिकांना मदत करता करता समाजातील आर्थिक दरीचे भीषण वास्तव त्यांच्यासमोर आले आणि त्यांनी आपल्या कार्याची कक्षा रुंदावण्याचा निर्णय घेतला. समाजातील प्रत्येक गोरगरीब, अनाथांनाही मदत करुन त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी संस्थेने काही नवीन उपक्रम सुरू केले आहेत. मुलींचा घटता जन्मदर लक्षात घेऊन संस्थेने ‘बेटी बचाव’ अभियान हाती घेतले आहे. शहरातील गरजू दाम्पत्यांना मुलींच्या भवितव्यासाठी संस्था आर्थिक मदतही करणार आहे. त्यासाठी मुलींच्या नावे दरवर्षी संस्था पाचशे रूपये बँकेत ठेव ठेवणार आहे. अलिकडेच महाराष्ट्र दिनी हा उपक्रम सुरू झाला.
२६ जुलैला झालेल्या अतिवृष्टीत अनेकांचे संसार वाहून गेले. यावेळी निसर्गाच्या रुद्रावताराचा सामना करत सामान्यांना मदत करण्यासाठी शशिकांत म्हात्रे, स्वप्ना पाटील, प्रकाश पाटील, स्वानंद भणगे, आरती सिंह, प्रशांत म्हात्रे, मिलिंद म्हात्रे हे सात सदस्य पुढे आले. यावेळी रेल्वेत अडकलेल्यांना मदत करणे, नाश्ता पाणी पुरविणे, झोपडीत पाणी शिरलेल्या नागरिकांना आसरा देणे अशा प्राथमिक सोयी सुविधा त्यांनी नागरिकांनी देऊ केल्या. आपत्तीकाळातील या मदतीने समाजकार्य करण्याची प्रेरणा या समूहाला मिळाली. त्यातून लहान-मोठे उपक्रम राबविण्यास त्यांनी सुरूवात केली. मुंबईमध्ये झालेल्या रेल्वे बॉम्बस्फोटात जखमी झालेल्यांची परवड त्यांनी पाहिली. दररोज रेल्वे अपघातात बळी जाणाऱ्यांची परवडही त्यांना माहिती होती. त्यामुळे अशा अपघातग्रस्तांना मदत करण्याचा निश्चय त्यांनी केला. २०१० मध्ये संस्थेची अधिकृत स्थापना करुन त्याद्वारे रेल्वे अपघातात जखमी झालेल्यांना व मृत पडलेल्यांच्या नातेवाईंकाना ते मदत करू लागले. संस्थेचे सध्या ३५० हून अधिक सभासद आहेत. मध्य रेल्वेचा आवाका खुप मोठा असल्याने त्यांनी आपले कार्य ठाणे जिल्’ाापुरते सिमीत ठेवण्याचा निर्णय घेतला. या विभागात जखमी झालेल्यांना मदतीचा ओघ सुरु केला. आत्तापर्यंत संस्थेने २५० हून अधिक गरजूंना मदत केली आहे. समाजात गरजूंची
संख्या जास्त असून संस्थेकडे तेवढे आर्थिक पाठबळ नाही. गोदरेज फाऊंडेशन संस्थेला दरवर्षी दोन लाख रूपयांची मदत करते. डोंबिवलीतील श्री गणेश मंदिर संस्थाननेही मदतीचा हात देऊ केला आहे. या मदतीमधूनच संस्था गरजूंना मदत करीत आहे. गरजूंना रुग्णालयातील वैद्यकीय खर्च देणे, ज्या कुटूंबाचा मुख्य आधारच गेला आहे, त्यांना आर्थिक मदत करणे, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणे, एखाद्याचा विवाह लावून देणे, अंत्यविधीसाठी निधी यांसारखी मदतही संस्थेने केली आहे. रेल्वे अपघातात जखमी झालेल्यांना मदत मिळावी म्हमून संस्थेच्या सभासदांनी अनेकदा राज्य शासनाच्या पायऱ्या झिजविल्या आहेत, परंतू त्यांच्या पदरी केवळ निराशाच पडली आहे. तरीही खचून न जाता त्यांनी आपला लढा सुरुच ठेवला आहे.
रेल्वे अपघातात दरवर्षी कल्याण-डोंबिवलीतील साठहूनही अधिक मृत किंवा अपंग होतात.अशांना संस्था यथाशक्ती मदत करतेच, शिवाय अन्य गरजवंतांच्या अडचणी सोडविण्याचाही प्रयत्न करते. रुग्णांना रुग्णालयाचा खर्चही परवडत नसल्याने डोंबिवलीतील १२० रुग्णालयातील प्रमुखांना उपचाराच्या बिलामध्ये सुट देण्याची विनंती संस्थेने केली होती. त्यातील २८ रुग्णालयाच्या प्रमुखांनी १० ते २० टक्के सुट देण्याचे लेखी आश्वासन संस्थेला दिले आहे. गरजूंच्या शिक्षणाचा खर्च, विनाशुल्क विवाह नोंदणी, लघु उद्योग उभारणीसाठी इच्छुकांना प्रशिक्षण अशा स्वरुपाची मदत या उपक्रमातून केली जाणार आहे. याशिवाय संस्थेने १ मे पासून एका नव्या उपक्रमाला सुरुवात केली आहे. मुलींना घटता जन्मदर लक्षात घेऊन संस्थेने ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या उपक्रमात गरजू दाम्पत्यांना मुलींच्या शैक्षणिक भवितव्यासाठी दरवर्षी ५०० रूपये मदत केली जाणार आहे. त्यात पालकांनी भर टाकून ते पैसे मुलींच्या नावे गुंतवावेत, यासाठी संस्थेचे कार्यकर्ते प्रयत्न करणार आहेत.
विविध स्वरुपाची सामाजिक कामे करणाऱ्या या संस्थेला शासकीय भूखंड मिळावा यासाठी पदाधिकारी गेल्या अनेक वर्षांपासून सरकारदरबारी खेटे घालीत आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडेही निवेदने दिली असून जिल्’ााधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशानुसार जमिनीची कागदपत्रेही संस्थेच्या वतीने सादर करण्यात आली आहेत. मात्र अद्याप आम्हाला जागा मिळाली नसल्याचे प्रकाश पाटील सांगतात. डोंबिवलीतील आयरे रोड येथील पाण्याच्या टाकीजवळील मोकळ्या जागेतील ३०० चौरस फुटाची जागा संस्थेला मिळावी यासाठी त्यांनी पालिकेकडे पत्रव्यवहारही केला आहे. रेल्वे अपघातात गरजूंना लागणारी साहित्य ठेवण्यासाठी ही जागा संस्थेला हवी आहे. अथवा पुसाळकर उद्यानाच्या समोरील टाटा पॉवर लाईनच्या बाजूलाही एक मोकळा भूखंड आहे तो संस्थेला मिळावा म्हणून प्रयत्न सुरु आहेत. पालिकेने आम्हाला सहकार्य करावे. तसेच शहरातील दानशूर व्यक्तींनीही संस्थेला मदत करावी. जेणेकरुन गरजूंना मदत करणे शक्य होईल, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.

– शर्मिला वाळुंज