वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस, एमएमआरडीएचा निर्णय

किशोर कोकणे, ठाणे</strong>

वडाळा ते कासारवडवली या मेट्रो मार्गावर कापूरबावडी परिसरातील मेट्रो निर्माणाचे काम येथील वाहतूक कोंडी आणि आरेखनातील काही बदलांमुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पुढे ढकलले आहे. या भागात वाहतूक कोंडीची शक्यता लक्षात घेता प्रकल्पाचे सद्य:स्थितीत सुरू असलेले काम मार्गी लागताच येथील मातीपरीक्षण तसेच इतर कामे हाती घेतली जाणार आहेत.

ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो पाच प्रकल्पाला राज्य सरकारने नुकतीच मान्यता दिली असून या प्रकल्पाचे स्थानक कापूरबावडी येथे होणार आहे. त्यामुळे मेट्रो चार आणि पाच या दोन्ही प्रकल्पांचे कापूरबावडी हे एकच स्थानक असल्याने येथील आरेखन बदलण्यात आले आहे. त्यासाठी कापूरबावडी येथे मातीपरीक्षण करण्यात येणार आहे. हे काम अपरिहार्य असले तरी या मातीपरीक्षणामुळे कापूरबावडी जंक्शन येथे वाहतूक कोंडीची शक्यता निर्माण होणार असल्याने कापूरबावडी स्थानकातील हे काम काही महिने लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पावसाळा तोंडावर असल्याने हे काम सुरू झाल्यास घोडबंदर मार्गाचे प्रवेशद्वार मोठय़ा कोंडीत सापडेल, अशी भीती होती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई महानगर विकास प्राधिकरणातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.

वडाळा ते कासारवडवली या मेट्रो प्रकल्पासाठी एमएमआरडीएचे काम सुरू आहे. त्यासाठी रस्त्याच्या मधोमध आणि कडेला ठिकठिकाणी अडथळे उभारण्यात आले आहेत, तर महापालिकेनेही या ठिकाणांवरील सेवा रस्त्यांवर खोदकाम केल्यामुळे अत्यंत निमुळत्या रस्त्यावरून वाहनांना ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे अनेकदा या मार्गावर वाहतूक कोंडी होत असते. त्यातच ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो पाच प्रकल्पालाही मान्यता मिळाल्यानंतर  वडाळा ते कासारवडवली मेट्रो चार आणि ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो पाचसाठी कापूरबावडी हे एकच स्थानक निर्माण करण्यात येणार आहे. त्यामुळे कापूरबावडी येथील आरेखनात काही बदल केले असून त्यासाठी येथील मातीपरीक्षण करण्यात येणार होते. हे मातीपरीक्षण करण्यासाठी या मार्गावरील रस्त्याचा सहा मीटर रुंद मार्ग संपादित केला जाणार असल्याची माहिती एमएमआरडीएच्या एका अधिकाऱ्याने दिली.

कापूरबावडी सिग्नलजवळ मुंबई, भिवंडी, नाशिक मार्गावरून घोडबंदरच्या दिशेने जाणारी आणि येणारी वाहने एकाच वेळी एकत्र येत असतात. त्यामुळे मातीपरीक्षण करण्यास परवानगी दिल्यास पावसाळ्यात वाहतूक कोंडी होण्याचा धोका निर्माण झाला होता. ही संभाव्य वाहतूक कोंडी लक्षात घेता मातीपरीक्षणासाठी वाहतूक शाखेने येथील एमएमआरडीएची परवानगी पुढे ढकलली आहे. त्यामुळे या मार्गावरील कोंडी तूर्तास टळणार आहे.

कापूरबावडी येथे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी मेट्रोला लागणारी परवानगी पुढे ढकलण्यात आली आहे. पावसाळ्यात त्यांना परवानगी देण्यात येऊ शकते. मात्र यासंबंधी अभ्यास करूनच पुढील निर्णय घेतला जाईल.

 – आर.आर. सावंत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कापूरबावडी वाहतूक शाखा