अपुरा कर्मचारी वर्ग आणि संभाव्य देखभालीच्या खर्चात भर पडल्याने व्यवस्थापन चिंताग्रस्त

राज्य सरकारने ठाण्यासह कल्याण-डोंबिवली परिसरातही खास महिलांसाठी बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने आधीच डबघाईला आलेल्या परिवहन व्यवस्थापनाच्या पोटात गोळा आला आहे. अपुरा कर्मचारी वर्ग आणि आगारात उभ्या असणाऱ्या बसेसवर होणाऱ्या देखभालीच्या खर्चात आणखी चार नव्या बसगाडय़ांची भर पडणार आहे. त्यामुळे हा खर्च कसा पेलवायचा, या चिंतेत सध्या परिवहन समितीमधील सदस्य आणि व्यवस्थापन आहे.

बसचालक आणि वाहकांची अपुरी संख्या, आगारात उभ्या असलेल्या बसेसची देखभाल-दुरुस्ती करताना कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रमाच्या नाकीनऊ आले आहे. अगदी स्थापनेपासूनच ढिसाळ नियोजनामुळे कल्याण डोंबिवली परिवहन उपक्रमाचे उत्पन्न कमी आणि खर्च अधिक अशी स्थिती आहे. राज्य शासनाने पाच महापालिका क्षेत्रांत महिलांसाठी खास ‘तेजस्विनी’ बसगाडय़ा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून यामध्ये कल्याण डोंबिवली महापालिका परिवहनचाही समावेश आहे. चालक-वाहकांअभावी आधीच केडीएमटीच्या आगारांत ६० बसेस उभ्या आहेत. असे असताना आता या बसेससाठी महिला चालक-वाहकांची नेमणूक करणे, त्या बसगाडय़ांची देखभाल-दुरुस्ती आदीचा खर्चही केडीएमटीवर येणार आहे.

राज्यामध्ये ज्या महापालिकांची स्वतची वाहतूक व्यवस्था आहे, अशा महापालिकांच्या क्षेत्रात महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी राज्य शासनातर्फे महापालिका क्षेत्रात तेजस्विनी बस सुरू करण्याची घोषणा राज्य शासनाने केली आहे. येत्या दोन महिन्यांत या बसेस महापालिकेच्या परिवहन ताफ्यात दाखलही होणार आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन ताफ्यात कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे बस आगारात उभ्या असलेल्या बसेसची संख्या मोठी आहे. त्यामुळे नव्या बसेस ताफ्यात दाखल होताच खर्च वाढतो, मात्र उत्पन्नाच्या आघाडीवर फारसे काही घडत नाही असा यापूर्वीचा अनुभव आहे.

महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्य शासनाचा हा निर्णय योग्य आहे. रेल्वेने महिलांसाठी सुविधा दिली असून महिला स्पेशल लोकलच्या वेळेचा अंदाज घेऊन या बसेसच्या फेऱ्या ठरविण्यात येणार आहेत. जेणेकरून नोकरदार महिलांना याचा फायदा होईल. तसेच या योजनेच्या माध्यमातून २० महिला चालक व २० महिला वाहकांची नेमणूक करण्यात येणार आहे. येत्या दोन महिन्यांत या बसेस परिवहनच्या विभागात दाखल होतील, तसेच जेएनएनयूआरएम अंतर्गत असलेल्या बसेस रस्त्यावर उतरविण्यासाठी एजन्सीची नेमणूक करण्यात आली असून याची घोषणा येत्या सोमवारी होईल. -भाऊ चौधरी, सभापती, परिवहन.

यापूर्वीही प्रयोग फसला

केडीएमटीने महिलांसाठी दोन वर्षांपूर्वी डोंबिवली-पनवेल महिला स्पेशल बस सुविधा सुरू केली होती. सुरुवातीला या बसला चांगला प्रतिसाद मिळाला; परंतु नंतर या बसगाडय़ांच्या वेळा निश्चित नसल्याने महिलांचा प्रतिसाद कमी होऊन ही सेवा बंद पडली.