महिलांचा प्रवास अधिक सुरक्षित होणार

ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात महिला प्रवाशांसाठी ५० तेजस्वीनी बसगाडय़ा मार्चअखेपर्यंत उपलब्ध करून देण्याचा संकल्प प्रशासनाने केला आहे. या बसगाडय़ांच्या खरेदीची प्रक्रिया आणि दैनंदिन परिचालनाच्या नियोजनासाठी प्रशासनाने जोरदार हालचाली सुरूकेल्या आहेत. त्यामुळे तीन महिन्यानंतर शहरातील महिला प्रवाशांना स्वतंत्र बससेवा मिळणार असून त्याचबरोबर त्यांचा प्रवास अधिक सुरक्षित होण्याची चिन्हे आहेत.

महिलांना प्रवासासाठी स्वतंत्र बस उपलब्ध व्हावी आणि त्यांचा प्रवास अधिक सुरक्षित व्हावा या हेतूने राज्य शासनाने तेजस्विनी बस योजना सुरू करण्याचा निर्णय गेल्या वर्षी घेतला होता. या निर्णयानुसार मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर आणि कल्याण-डोंबिवली या शहरांना एकूण ३०० बसगाडय़ा मिळणार आहेत. त्यापैकी ५० बसगाडय़ा ठाणे शहराला मिळणार असून या प्रस्तावास परिवहन समिती तसेच सर्वसाधारण सभेने काही महिन्यांपूर्वी मान्यता दिली होती. या मान्यतेनंतर बसगाडय़ा खरेदीचा मार्ग मोकळा झाला होता. दरम्यान, या बस गाडय़ांच्या खरेदीसाठी परिवहन प्रशासनाने जोरदार हालचाली सुरूकेल्या आहेत. केंद्र शासनाच्या जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत ठाणे परिवहन उपक्रमाला १९० बसगाडय़ांच्या खरेदीसाठी निधी मिळाला असून त्यापैकी १५० बसगाडय़ा परिवहन सेवेच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. उर्वरित बसगाडय़ा काही महिन्यांत दाखल होणार आहेत. या बस खरेदीसाठी काढण्यात आल्या निविदेमध्ये एक अट समाविष्ट करण्यात आली होती. त्यामध्ये या बसगाडय़ांची ज्या दराने खरेदी करण्यात आली, त्याच दराने नवीन २५ टक्के बसची खरेदी करण्यात येईल, असे नमूद केले होते. या अटीमुळे त्याच ठेकेदाराकडून नवीन ५० बसगाडय़ा परिवहन प्रशासनाला खरेदी करता येऊ शकतात. त्यामुळे तेजस्विनी बसगाडय़ा याच ठेकेदाराकडून जुन्या दरानेच खरेदी करण्याचा प्रशासनाचा विचार सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

तेजस्विनी बसगाडय़ा परिवहन सेवेच्या उपक्रमामार्फत चालविण्यात याव्यात किंवा खासगी ठेकेदारामार्फत चालविण्यात याव्यात, अशा दोन प्रस्तावांवर प्रशासन विचार करीत आहे. याबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. या दोन्हीपैकी कोणत्याही एका प्रस्तावावर शिक्कामोर्तब झाले तरी परिवहन प्रशासनाकडून या बससेवेसाठी महिला वाहक उपलब्ध करून दिले जाणार आहेत.