पालघर जिल्ह्यात अडकलेल्या मजुरांना घेऊन जाणण्यासाठी पश्चिम रेल्वेने विशेष ट्रेनची व्यवस्था केली आहे. त्यापैकी पहिली ट्रेन शनिवारी मध्यरात्री साडे बारा वाजता वसई रोड रेल्वे स्थानकातून सुटणार आहे. टाळेबंदीच्या काळात पालघर जिल्ह्याच्या विविध भागात मजूर अडकून पडले होते. याशिवाय मुंबईच्या विविध भागातून जिल्ह्याच्या सीमा ओलांडून जाणाऱ्या मजुरांना पोलिसांनी अडवून अलगीकरणात ठेवले होते.

या सर्वाना घेऊन जाण्यासाठी या विशेष ट्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. वसई रोड ते गोरखपुर (०९५७) अशी विशेष ट्रेन शनिवारी रात्री साडेबारा वाजता वसईहून गोरखपुर साठी रवाना होणार आहे. ही ट्रेन महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश अशा चार राज्यांमधून जाणार आहे.

४ तारखेला दुपारी २ वाजता ही ट्रेन गोरखपूर स्थानकात पोहचेल. नंतर चार तारखेला पुन्हा दुपारी ४ वाजता ही ट्रेन (०९५८) गोरखपूर येथून वसई रोड कडे रवाना होणार आहे व पाच तारखेला पहाटे साडेपाच वाजता ही वसई येथे पोहोचणार आहे. २२ डब्याच्या या विशेष ट्रेन मध्ये १२०० प्रवासी मजदूर प्रवास करणार आहेत. प्रवासासाठी ७४० रुपये तिकीट आकारण्यात आले आहे.

गर्दी होऊ नये यासाठी वसई स्थानकात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक सत्या कुमार यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे सध्या आम्ही एका ट्रेनमधून बाराशे मजुरांना नेणार आहोत असे त्यांनी सांगितले. त्यानंतर पुढील ट्रेन सोडण्याचा विचार केला जाईल असेही ते म्हणाले