सलग तिसऱ्या दिवशी वसईकरांचे हाल; परिवहनच्या बस आगारातच

वसई : वसई-विरार महापालिकेच्या परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप सलग तिसऱ्या दिवशी कायम आहे. त्यामुळे शुक्रवारीही एकही बस रस्त्यावर धावली नाही आणि वसईकरांना गैरसोयीला तोंड द्यावे लागले. कामगारांच्या मूलभूत मागण्या मान्य न केल्यास संप मागे घेणार नसल्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतल्याने संपाचा तिढा सुटत नसल्याचे दिसून येत आहे.

ठेकेदार प्रत्येक महिन्याला वेळेत आणि पूर्ण पगार देत नाही, अशी कामगारांची मुख्य तक्रार आहे. याशिवाय मागील वर्षभरापासून कामगारांच्या भविष्यनिर्वाह निधीची रक्कम जमा करण्यात आलेली नाही. तसेच कामागारांनी सुरू केलेल्या पतपेढीत कामगारांच्या पगारातून विशिष्ट रक्कम कापून ती पतपेढीत जमा केली जाते. कामगारांच्या अंशदानातून जमा झालेली १५ लाख रुपयांची रक्कम ठेकेदाराने स्वत:कडे ठेवली आहे. ती रक्कम पतसंस्थेत जमा करावी, अशीही कामगारांची मागणी आहे. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी कामगारांनी बुधवारी रात्रीपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी परिवहनची एकही बस रस्त्यावर धावली नाही. परिणामी हजारो प्रवाशांचे हाल सुरू आहेत.

माजी आमदार विवेक पंडित यांनी शुक्रवारी संपाचा तिढा सोडवण्यासाठी अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, परिवहन सेवेचे माजी सभापती भरत गुप्ता, विद्यमान सभापती प्रितेश पाटील यांच्यासह परिवहन सेवेच्या ठेकेदाराची एक संयुक्त बैठक पालिकेच्या मुख्यालयात घेतली. कामगारांना टप्प्याटप्प्याने वेतन न देता सर्व कामगारांना प्रत्येक महिन्याच्या विशिष्ट तारखेला वेतन द्यावे, कामगारांच्या भविष्यनिर्वाह निधीची जवळपास सव्वा ११ कोटींची रक्कम जमा करण्यात आलेली नसून ती ताबडतोब खात्यात जमा करावी. त्याचप्रमाणे कामगारांची पतपेढीत कामगारांच्या अंशदानातून जमा झालेली सुमारे १५ लाख रुपयांची रक्कम ठेकेदाराने स्वत:कडे ठेवली आहे. ती रक्कम पतसंस्थेत जमा करावी आदी मागण्या यावेळी कामगारांच्या वतीने करण्यात आल्या.

वसई-विरार महापालिकेची परिवहन सेवा पूर्णत: ठेका पद्धतीवर चालवली जात आहे. भगिरथी ट्रान्सपोर्ट प्रा. लिमिटेडला हा ठेका देण्यात आला आहे. परिवहनच्या ताफ्यात १६० बस असून ६५० कर्मचारी ठेका पद्धतीवर काम करीत आहेत. दररोज एक लाख प्रवासी प्रवास करतात. गेल्या अनेक महिन्यांपासून ठेकेदार महिन्याचा पगार वेळेवर देत नाही. संपूर्ण पगार एकत्रितपणे देत नाही.

अशी कामगारांची तक्रार आहे. अखेर हा संघर्ष टोकाला गेल्याने बुधवार सकाळपासून कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केले होते. संध्याकाळपर्यंत कोणताच तोडगा न निघाल्याने कामगारांनी बुधवारी रात्रीपासून बेमुदत संप सुरू केला. पुन्हा एसटी सेवेची मागणी

वसईत पुन्हा राज्य शासनाची एसटी सेवा सुरू करण्याची मागणी वसई-विरार शहर महापालिकेच्या माजी नगरसेविका जोस्पीन फरगोज यांनी केली आहे. मी वसईकर संघटनेनेही एसटी पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे. यासाठी संघटनेने शिवसेनेचे पालघर जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र फाटक यांच्याशी संपर्क करून  राज्य परिवहन मंडळाची सेवा तत्काळ सुरू व्हावी, अशी मागणी केली.

कामगारांच्या मागण्या महापालिकेला मान्य आहेत. मात्र, या मागण्यांची पूर्तता ठेकेदाराने करायची आहे, अशी भूमिका महापालिकेची आहे. मात्र ठेकेदार हा पालिकेसाठी सेवा राबवतो. त्यामुळे कामगारांच्या मागण्यांची पूर्तता करण्याची जबाबदारी महापालिकेचीही आहे. – विवेक पंडित, माजी आमदार, वसई

कामगारांच्या हितासाठी सकारात्मक बोलणी सुरू आहे. उद्यापर्यंत (शनिवारी) संपावर तोडगा निघेल. – प्रितेश पाटील, परिवहन सभापती, वसई-विरार महापालिका