22 January 2018

News Flash

तरण तलावांचे शुल्क दुप्पट

या दरवाढीचा फटका ठाणेकरांना बसण्याची चिन्हे आहेत.

खास प्रतिनिधी, ठाणे | Updated: October 12, 2017 1:43 AM

ठाणे महापालिकेचा प्रस्ताव; दरवर्षी २० टक्के शुल्कवाढ

ठाणे महापालिकेच्या कै. मारोतराव शिंदे आणि कै. यशवंत रामा साळवी या दोन्ही तरण तलावांच्या शुल्कात तब्बल ५० टक्के वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे मारोतराव शिंदे तरण तलावाच्या दरात ६०० ते १६०० रुपयांची, तर यशवंत रामा साळवी तरण तलावाच्या दरात ८०० ते २००० रुपयांची वाढ होणार आहे. त्याचबरोबर पुढील दोन वर्षांत दरवर्षी शुल्कामध्ये तब्बल २० टक्के वाढ करण्यात येणार आहे. या दोन्ही तरण तलावांच्या जमा-खर्चामध्ये मोठी तूट येत असल्याचे कारण पुढे करत, प्रशासनाने ही दरवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या दरवाढीचा फटका ठाणेकरांना बसण्याची चिन्हे आहेत.

शहरात ठाणे महापालिकेचे दोन तरण तलाव आहेत. त्यामध्ये गडकरी रंगायतन परिसरातील कै. मारोतराव शिंदे आणि कळव्यातील कै. यशवंत रामा साळवी या दोन तरण तलावांचा समावेश आहे. या दोन्ही तरण तलावांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी ठाणेकर गर्दी करतात. मात्र, प्रवेश क्षमता मोजकीच असल्यामुळे अनेकांना प्रवेश मिळत नाही. तसेच कळव्यातील तरण तलावाच्या दुरवस्थेवरून काही वर्षांपूर्वी लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला धारेवर धरले होते. तसेच दुरवस्थेमुळे तरण तलावाच्या सुविधेपासून वंचित राहावे लागत असल्यामुळे ठाणेकरांमधूनही संताप व्यक्त होत होता. त्यानंतर प्रशासनाने या तरण तलावाची दुरुस्ती करून तो खुला केला होता. या पाश्र्वभूमीवर प्रशासनाने मारोतराव शिंदे आणि कै. यशवंत रामा साळवी या दोन्ही तरण तलावांच्या शुल्कात ५० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर पुढील दोन वर्षांमध्ये प्रतिवर्षी शुल्कामध्ये तब्बल वीस टक्के वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रस्तावावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत. हा प्रस्ताव येत्या शुक्रवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे अंतिम मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. लोकप्रतिनिधी काय भूमिका घेतात, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

जमा-खर्चामध्ये तूट

ठाणे महापालिका तरण तलाव विभागातील कर्मचाऱ्यांचे वेतन, आस्थापना खर्च, यंत्रसामुग्री दुरुस्ती, तरण तलाव निगा व देखभाल हा सर्व खर्च उत्पन्नाच्या तुलनेत जास्त असल्याचे प्रशासनाने प्रस्तावात म्हटले आहे. २०१५-१६ या आर्थिक वर्षांमध्ये कै. मारोतराव शिंदे या तरण तलावाच्या जमा-खर्चामध्ये ८३ लाखांची तर कै. यशवंत रामा साळवी या तरण तलावामध्ये ६१ लाखांची तूट आहे. या पाश्र्वभूमीवर तरण तलावाची दरवाढ करणे अपरिहार्य असल्याचे प्रशासनाने प्रस्तावात स्पष्ट केले आहे.

अन्य तरण तलावांशी तुलना

ठाणे शहराच्या आसपास असलेल्या मुलुंड, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई तसेच शहरातील रहेजा, कोपरीतील वि. दा. सावरकर या तरण तलावांचे दर महापालिकेच्या दोन्ही तरण तलावांपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे या सर्वच तरण तलावांचे शुल्क लक्षात घेऊन महापालिकेने दोन्ही तरण तलावांच्या शुल्कात वाढ केली आहे.

First Published on October 12, 2017 1:43 am

Web Title: swimming pool fee increases tmc
  1. No Comments.