18 January 2019

News Flash

उड्डाणपुलांचा मुहूर्त हुकला!

परिणामी यंदाच्या पावसाळय़ातही ठाणेकरांना भीषण वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागणार आहे.

मीनाताई ठाकरे चौकातील उड्डाणपुलाचे काम अद्याप सुरूच असल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे.

मे अखेरीस सुरू करण्याचा पालिकेचा दावा फोल; दोन पुलांच्या पूर्णत्वास विलंब

ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी उभारण्यात आलेले तीन उड्डाण पुल मे महिन्याच्या अखेरीस वाहतुकीसाठी खुले होतील, अशी घोषणा करणाऱ्या ठाणे महापालिकेचा दावा खोटा पडला आहे. या रस्त्यांवर उभारण्यात येणाऱ्या तीन उड्डाणपुलांपैकी एकच उड्डाणपूल सध्या सुरू झाला असून इतर दोन्ही उड्डाणपुलांची कामे सुरूच आहेत. त्यापैकी मीनाताई ठाकरे चौकातील पूल सुरू होण्यास सप्टेंबर उजाडण्याची शक्यता आहे. परिणामी यंदाच्या पावसाळय़ातही ठाणेकरांना भीषण वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागणार आहे.

ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागातील अनेक रस्ते रेल्वे स्थानक परिसराला जोडले असल्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. या वाहनांच्या तुलनेत रस्ते अपुरे पडू लागल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी महापालिका प्रशासनाने शहराच्या मध्यवर्ती भागात तीन उड्डाण पूल उभारणीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून अल्मेडा चौक, महात्मा गांधी पथ आणि मीनाताई ठाकरे चौक या ठिकाणी उड्डाण पूल उभारण्याचे काम सुरू झाले. तीन महिन्यांपूर्वी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या पुलांची पाहणी केली होती. त्यावेळी अल्मेडा चौकातील उड्डाण पूल १५ एप्रिल, महात्मा गांधी पथ येथील उड्डाण पूल १५ मे आणि मीनाताई ठाकरे चौकातील उड्डाण पूल ३० मे अखेपर्यंत खुला होईल, अशा पद्धतीने कामाचे नियोजन करण्याचे आदेश आयुक्त जयस्वाल यांनी दिले होते. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांचाही या पुलांच्या पाहणीसाठी दौरा झाला. त्यांनी ३० मेपर्यंत कामे आटोपती घेतली जातील, अशी घोषणा केली. मात्र, ही मुदत पाळणे पालिकेला शक्य झालेले नाही.

दरम्यान, या संदर्भात पालिकेचे कार्यकारी अभियंता प्रवीण पापळकर यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, ‘महात्मा गांधी पथ येथील उड्डाण पुलाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले असून तो महिनाभरात वाहतुकीसाठी खुला होऊ शकेल. तर मीनाताई ठाकरे चौकातील पुलाचे काम ८५ टक्के पूर्ण झाले असून तो सप्टेंबर महिन्यापर्यंत वाहतुकीसाठी खुला होऊ शकेल.’ हे दोन्ही पूल उभारणीच्या ठिकाणी विद्युतवाहिन्या, मलवाहिन्या असल्यामुळे त्या ठिकाणी पूल उभारणीच्या कामास काहीसा उशिरा झाला आहे, असा दावाही त्यांनी केला.

First Published on June 14, 2018 1:50 am

Web Title: thane bridges work tmc