करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील शहरांमध्ये टाळेबंदीचा निर्णय महापालिका प्रशासनांनी घेतला असताना आता ग्रामीण भागांतही निर्बंध लागू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी घेतला.

मीरा-भाईंदर, अंबरनाथ, भिवंडीमध्ये आधीच टाळेबंदी लागू आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवलीमध्ये आजपासून दहा दिवस टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. टाळेबंदीच्या अंमलबजावणीसाठी महापालिका आणि पोलीस प्रशासन सज्ज झाले असून, दोन्ही शहरांमध्ये पाच हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे.

नवी मुंबईतही ३ जुलैच्या मध्यरात्रीपासून १३ जुलैपर्यंत टाळेबंदी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने बुधवारी घेतला. शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती, एमआयडीसी आणि अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण शहरातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती नवी मुंबई महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दिली.

रुग्णवाढीमुळे पनवेल पालिका प्रशासनानेही पुन्हा टाळेबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ३ ते १३ जुलैपर्यंत निर्बंध लागू करण्यात येणार आहे. नागरिकांनी अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी न करण्याचे आवाहन पालिका (पान २ वर) (पान १ वरून) आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केले. पनवेल पालिका क्षेत्रात २४०० करोनाबाधित रुग्ण आहेत. ग्रामीण पनवेलमध्ये सव्वासातशे रुग्ण आहेत.

शहरांपाठोपाठ ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागांतील नगर परिषद आणि पंचायत क्षेत्रामध्ये निर्बंध लागू करणार असल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी बुधवारी रात्री जाहीर केले. त्यानुसार शहापूर, मुरबाड, कल्याण ग्रामीण, भिवंडी ग्रामीण़, अंबरनाथ ग्रामीणमध्ये निर्बंध लागू राहतील. २ जुलै रोजी रात्री १२ पासून ते ११ जुलै रोजी रात्री १२ वाजेपर्यंत टाळेबंदी लागू असणार आहे. या काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने ठराविक वेळेत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्य़ातील नगरपरिषद आणि पंचायत क्षेत्रामधील सर्व प्रकारच्या बाजारपेठा, सर्व दुकाने आणि खासगी आस्थापने या कालावधीत बंद राहणार आहेत. किराणा माल, जीवनावश्यक वस्तू, औषधांची दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत सुरु राहणार आहेत. औषधे, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक आणि मालवाहतूक वगळता इतर सर्व प्रकारच्या वाहतुकीवर बंदी आहे. अधिकृत प्रवास परवाना आणि ई-पासद्वारे प्रवासास मुभा आहे. पाचपेक्षा अधिक व्यक्तींना कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास मज्जाव असणार आहे, असे जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी म्हटले आहे.