महापालिकेच्या सूचनेनंतर पोलिसांची कार्यवाही

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात टाळेबंदी लागू असतानाही ठाणे बाजारपेठेतील भाजीपाला आणि धान्यबाजार सुरू होते. रुग्णसंख्या वाढत असल्याने येथील गर्दी टाळण्यासाठी आता महापालिकेच्या सूचनेनंतर भाजी आणि धान्यबाजार पोलिसांनी बंद केले आहेत. टाळेबंदी १२ जुलैपर्यंत आहे. त्यामुळे नागरिकांना भाजीपाला आणि धान्य मिळणे आता कठीण होणार आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात रुग्णसंख्या वाढत असल्याने शहरात २ जुलैपासून टाळेबंदीचे आदेश दिले आहेत. या टाळेबंदीत महापालिकेने शहरातील अत्यावश्यक वस्तूंची दुकानेही बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनीही यासंबंधीचे मनाई आदेश काढले आहेत. पोलिसांच्या आदेशात मात्र जीवनावश्यक वस्तूंना परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकारनेही जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, बाजारपेठा सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. पोलीस आणि महापालिकेच्या दोन वेगवेगळ्या आदेशामुळे व्यापारी आणि खरेदीदारांमध्ये संभ्रम वाढला आहे.

ठाणे शहराची मुख्य जांभळीनाका बाजारपेठ वगळता शहरातील इतर सर्वच भागांत दुकाने बंद ठेवण्यात आली होती. सकाळी ७ ते ११ भाजीपाला आणि सकाळी ८ ते दुपारी १ पर्यंत धान्यविक्रीला पोलिसांनी परवानगी दिली आहे. मात्र, या बाजारपेठांमध्ये आंतरसोवळ्याचे नियम पाळले जात नसल्याने त्या बंद ठेवण्यात याव्यात, असा आग्रह महापालिका प्रशासनाने धरला. या बाजारपेठा बंद ठेवण्याचे काम पोलिसांचे आहे. शासनाने अत्यावश्यक सेवा सुरूच ठेवण्यास सांगितल्याने ही बाजारपेठ सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे होते.

दरम्यान, जांभळी बाजारपेठ सुरू राहिल्यास टाळेबंदीला अर्थ उरणार नाही, असा आग्रह महापालिकेने धरल्याने अखेर ही बाजारपेठ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टाळेबंदी लागू होण्यापूर्वी पुरेसे अन्नधान्य आणले होते. आता ते संपत आहे. किराणा दुकाने बंद असल्याने त्याचा फटका बसत आहे. त्यामुळे महापालिकेने काही वेळेसाठी दुकाने खुली ठेवल्यास नागरिकांना त्यामुळे दिलासा मिळेल.

– सीमा जगताप, गृहिणी