घोडबंदर, कोपरी, माजिवडय़ातील रस्त्यांवरील मलमपट्टी निष्प्रभ

 ठाणे : मुसळधार पावसामुळे ठाण्यातील रस्त्यांवर पडलेले खड्डे महापालिकेने तातडीने बुजवले असले तरी, ही तात्पुरती मलमपट्टी तकलादू असल्याचे निदर्शनास आले आहे. माजिवडा पूल, कोपरीच्या दिशेने जाणारा सेवारस्ता, घोडबंदर सेवारस्ता, नितीन कॅडबरी पूल या ठिकाणी बुजवण्यात आलेले खड्डे पुन्हा उखडले आहेत. त्यामुळे घोडबंदर ते आनंदनगर पथकर मार्गावरील वाहतूक कोंडी कायम आहे.

पूर्व द्रुतगती मार्ग आणि घोडंबदर मार्ग या दोन्ही मार्गावर जागोजागी खड्डे तयार झाले असून दोन मार्गिकांमधील डांबर निघून गेल्याने निर्माण झालेल्या फटीत चाक रुतून दुचाकींचे अपघात होत आहेत. खड्डे चुकविण्याच्या नादात वाहनेही खड्डय़ात अडकून बंद पडत आहेत. धर्मवीर आनंद दिघे प्रवेशद्वार, आनंद नगर पथकरनाका, माजिवडा पेट्रोल पंप परिसर, माजिवडा जंक्शन, घोडबंदर सेवारस्ता, कोपरी सेवारस्ता, जेल तलाव चौक, बाळकुम नाका, बाळकुम गाव  या भागांतील रस्त्यांवर भल्या मोठय़ा आकाराचे खड्डे पडले होते. बी केबिन स्टेशन मार्ग, चिंतामणी चौक, विवाह नोंदणी कार्यालय परिसर, जांभळी नाका, मखमली तलाव रोड, मीनाताई ठाकरे चौक, ठाणे शासकीय विश्रामगृह चौक या भागांत मोठय़ा प्रमाणावर खड्डे पडलेले आहेत. या खड्डय़ांमुळे वाहनचालाकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. काही खड्डे इतके खोल आहेत की त्यांच्यामुळे वाहनाला मोठी हानी पोहोचत आहे.

गेल्या काही दिवसांपासून ठाणे महापालिकेतर्फे रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पावसामुळे डांबर किंवा अन्य साहित्य वापरून खड्डे बुजविणे शक्य होत नसले तरी संभाव्य अपघात टाळण्यासाठी तात्पुरता पर्याय म्हणून पेव्हर ब्लॉक आणि बांधकाम साहित्य वापरून खड्डे बुजविण्यात येत आहेत. तसेच पाऊस थांबल्यानंतर डांबर किंवा अन्य साहित्य वापरून खड्डे भरण्यात येणार आहेत, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. मात्र खड्डे बुजवण्यासाठी  करण्यात येणारे तात्पुरते उपाय कुचकामी ठरत आहेत.  खड्डे बुजवण्यासाठी पेव्हर ब्लॉक टाकण्यात आले आहेत. मात्र खड्डय़ात टाकलेल्या या पेव्हर ब्लॉकवर वाहनांचा भार पडून ते अधिक आत रुतले गेलेले आहेत आणि पुन्हा त्या ठिकाणी खड्डा निर्माण झाल्याचे दिसून आले आहे.

तसेच खड्डे बुजवण्यासाठी खड्डय़ात टाकण्यात आलेले डांबरही वाहून गेल्याचे दिसून येत आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी गेल्या आठवडय़ात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना रस्त्यावर उतरावे लागले होते. त्यापाठोपाठ महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मंगळवारी सर्व यंत्रणा रस्त्यावर उतरवून शहरातील खड्डे बुजविण्याची कामे केली. मात्र खड्डे बुजवण्याचा उपाय हा पूर्णपणे निष्प्रभ ठरला आहे.

भिवंडी परिसरात खड्डय़ांचे साम्राज्य

ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या आणि नव्याने गृहसंकुले तयार होणाऱ्या भिवंडीतील कशेळी काल्हेर परिसरातील रस्त्यावर भले मोठे खड्डे तयार झालेले आहेत. या भागात मोठय़ा प्रमाणावर गोदामे, कारखाने आहेत. त्यामुळे कशेळी काल्हेर मार्गावर अवजड मालवाहू वाहनांची मोठी ये-जा असते. कशेळी काल्हेर एस एस रुग्णालय परिसरात रस्त्यांची चाळण झाली आहे. येथील पथकर नाक्याजवळदेखील मोठय़ा प्रमाणावर खड्डे आहेत.