ठाणे शहर जितक्या वेगाने पसरत गेले, तितक्याच किंबहुना त्याहून अधिक वेगाने कळवा शहराचा विस्तार होत गेला. अनधिकृत बांधकामे आणि अस्वच्छ परिसर यामुळे कळव्याकडे पाहून नाके मुरडणारे आता येथील मोठमोठय़ा गृहसंकुलांकडे आणि बहुमजली इमारतींकडे आकर्षित होत आहेत. नियोजनबद्ध विकास न झाल्याने कळव्याचे हे विकासचित्र विचित्र दिसत असले तरी, परवडणाऱ्या घरांची मागणी आणि ठाणे, नवी मुंबई, कल्याण या शहरांशी असलेली भौगोलिक जवळीक यामुळे कळव्यातील बांधकाम व्यवसायाला अधिक चांगले दिवस आले आहेत.  असे असले तरी, पायाभूत सोयीसुविधांच्या बाबतीत आजही हे शहरवजा उपनगर पिछाडीवर आहे. वसाहती, गावांतर्गत रस्त्यांची दुर्दशा, कचऱ्याचे व्यवस्थापन, पाणीपुरवठा, वाहतूक समस्या या गोष्टींमुळे कळवावासीयांना वेदनांच्या कळा सोसून जगावे लागत आहे. नेमके हेच चित्र पालटण्याची ताकद या परिसरात भविष्यात होऊ घातलेल्या प्रकल्पांमध्ये आहे. उन्नत मार्ग, नवा खाडी पूल, रेल्वे उड्डाणपूल, नाटय़गृह, चौपाटी अशा प्रकल्पांमुळे कळव्यातील उद्याचे दृश्य कसे असेल, याचा जयेश सामंत आणि नीलेश पानमंद यांनी घेतलेला वेध..

खारेगाव रेल्वेमार्गावर उड्डाणपूल
खारेगाव येथील मध्य रेल्वे रुळांवर उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव आखण्यात आला आहे. हे काम कुणी करावे यावरून मध्यंतरी ठाणे महापालिका आणि रेल्वे प्रशासनात मतभेद होते. या मार्गावर उड्डाणपूल उभारला गेल्यास रेल्वे वाहतुकीला बांध बसणार नाही, शिवाय खारेगाव परिसरात होणारी वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होणार आहे. या कामाची गरज लक्षात घेऊन प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे. या उड्डाणपुलाचे आराखडे महापालिकेने तयार केले असून ते रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहेत.
सद्य:स्थिती : या प्रस्तावाला रेल्वे विभागाने मान्यता देऊन रेल्वे विभागामार्फत उड्डाणपूल उभारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.  रेल्वे हद्दीबाहेरील पुलाच्या जोडरस्त्याचे काम ठाणे महानगरपालिका करणार असून, येत्या वर्षभरात हे काम सुरू करण्यात येणार आहे. यासाठी आरक्षणबदलाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या कामासाठी अर्थसंकल्पात सुमारे ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
Trafficनवा समांतर रस्ता
ठाणे शहरातून नवी मुंबई किंवा मुंब्रा-दिवा तसेच डोंबिवली भागात जाणारी अनेक वाहने कळवा नाका येथून जातात. तसेच या नाक्यावरून अवजड वाहनेही जात असतात. त्यामुळे कळवा नाका वाहतूक कोंडीचे आगार बनू लागले आहे. कळवा नाक्यावरील वाहतुकीचा भार कमी व्हावा यासाठी एखादा समांतर रस्ता असावा अशी मागणीपुढे येत आहे. अखेर राज्य सरकारच्या संमतीने ही वाहतूककोंडी दूर करण्यासाठी कळवा नाका ते रेतीबंदर यांना जोडणारा नवीन समांतर रस्त्याची निर्मिती करण्याचा निर्णय झाला आहे.
सद्यस्थिती : कळवा नाका ते रेतीबंदर यांना जोडणाऱ्या नवीन समांतर रस्त्याच्या कामाला मान्यता मिळालेली आहे. हा सगळा परिसर महापालिकेच्या अखत्यारीत येत असल्याने त्यासाठी मूळ विकास आराखडय़ात काही आरक्षण बदल करणे आवश्यक ठरणार आहे. या बदलांची प्रक्रियाही सुरू झाली आहे. कळवा ते खारेगार रेतीबंदपर्यंत या मार्गावरील वाहतुकीचा ताण समांतर रस्त्यामुळे कमी होईल, असा अंदाज आहे.
कळवा खाडीवर नवा पूल
कळव्यातील बहुतांश रहिवासी मुंबई गाठण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकाच्या दिशेने प्रवास करतात. तसेच मोठी खरेदी अथवा बाजारपेठांसाठी ठाण्याचा रस्ता धरतात. त्यामुळे कळवा, मुंब्रावासीयांसाठी बाजारहाट अथवा शैक्षणिक, मनोरंजनाच्या सुविधांसाठी ठाणे हेच केंद्र आहे. ठाणे आणि कळवा-मुंब्रा शहराला जोडणारे दोन पूल खाडीवर अस्तित्वात असले, तरी वाहनांची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढल्याने तेही कमी पडू लागले आहेत. ठाण्यातून नवी मुंबई, कोकण, पुण्याच्या दिशेने जाण्यासाठी ठाणे-बेलापूर रस्ता सोयीचा ठरतो. कळवा खाडीवर सध्या सुमारे शंभर वर्षांपूर्वी उभारण्यात आलेला ब्रिटिशकालीन पूल अस्तित्वात आहे. या पुलास लागून २० वर्षांपूर्वी नवा पूल उभारण्यात आला. सप्टेंबर २०१० रोजी जुन्या पुलाच्या कमानीचे काही दगड निखळून पडले. तसेच त्या पुलाचे आयुष्यमान संपले आहे. त्यामुळे कळवा खाडीवर साकेतकडील बाजूस नवा पूल बांधण्याच्या कामाचा प्रस्ताव आखण्यात आला आहे.
सद्य:स्थिती : या पुलाच्या कामासाठी सुमारे १८० कोटी रुपयांचा खर्च येणार असून यासंबंधीची निविदा प्रक्रिया विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उरकण्यात आली आहे. असे असले तरी पुलाची उभारणी करताना मोठय़ा प्रमाणावर खारफुटींची कत्तल करावी लागणार आहे. त्यामुळे पर्यावरण विभागाची या कामासाठी मंजुरी मिळविण्याची प्रक्रिया गेल्या सहा महिन्यांपासून सुरू होती. पर्यावरण विभागाने मंजुरी दिल्याने हे काम लवकरच सुरू होऊ शकणार आहे. हे काम येत्या तीन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. नियोजित पूल हा उत्तरेकडील साकेत बाजूस बांधून त्यास ठाण्याकडील बाजूस तीन रस्त्यांवरून अप रॅम्प देण्यात येणार असून खाडी पार केल्यावर पुलाची एक मार्गिका कळवा शिवाजी चौकात व दुसरी मार्गिका छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयासमोर उतरणार आहे. या कामासाठी राज्य शासन किंवा एमएमआरडीएकडून निधी प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल.
नवे रुग्णालय
ठाणे महापालिकेचे कळवा परिसरात एकमेव रुग्णालय असून तिथे मुंब्रा भागातील रुग्णही येतात. त्यामुळे मुंब्रा भागात १०० खाटांचे अत्याधुनिक रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ४.१२ हेक्टर जागेवर हे रुग्णालय उभारण्यात येणार असून त्यासाठी १३ कोटी रुपयांची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
सद्यस्थिती : नवे रुग्णालय उभारण्याचे काम महापालिकेमार्फत सुरू असून मार्च २०१७ पर्यंत हे काम पूर्ण होणार आहे.
मुंब्य्रात प्रादेशिक क्रीडा प्रेक्षागृह
मुंब्रा-कौसा भागातून अनेक क्रीडापटू तयार व्हावेत, यासाठी या भागात क्रीडा प्रेक्षागृह उभारण्यात येत आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच त्याचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. या कामासाठी १२.३४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
कम्युनिटी कॉलेज
कळवा परिसरात कम्युनिटी कॉलेज उभारण्यात येणार आहे. हे महाविद्यालय मुंबई आणि अमेरिकन विद्यापीठाच्या सहकार्याने सुरू करण्यात येणार आहे.  यासंदर्भात शासनस्तरावर कार्यवाही सुरू आहे.
खाडीकिनारी चौपाटी
खारेगाव येथील खाडीकिनारी भागात सुमारे तीन किलोमीटर लांबीचा परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. पर्यटन स्थळाच्या धर्तीवर या भागात चौपाटी तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे कळवा-मुंब्य्रासह ठाणेकरांना नवे पर्यटन स्थळ मिळणार आहे. खारेगाव रेती बंदरापासून मुंब््रयाच्या पायथ्यापर्यंत दोन किलोमीटर अंतराची चौपाटी उभारून त्यासाठी नियोजित असे पर्यटन केंद्र उभारण्याचा प्रकल्प ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने आखला आहे. मात्र, या भागात रेती व्यावसायिक वर्षोनुवर्षे व्यवसाय करीत असून त्यांचा या प्रकल्पास विरोध आहे. त्यामुळे हा प्रकल्प उभारणीसाठी या व्यावसायिकांना विश्वासात घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.
सद्यस्थिती : खाडीकिनारी चौपाटी उभारण्यासंबंधी जिल्हा प्रशासनाने सविस्तर आराखडा तयार केला असून तो प्रत्यक्षात उतरविण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे. मध्यंतरी या प्रकल्पासाठी खाडीकिनारी भागातील बेकायदा बांधकामे हटविण्याची कारवाई करण्यात आली.
कळवा पोलीस ठाणे
गेल्या २० वर्षांत कळवा विभागाकरिता असलेल्या पोलीस ठाण्याला हद्दीत जागा मिळू शकली नाही. त्यामुळे कळव्याच्या बाहेर ठाणे शहरात हे पोलीस ठाणे उभारण्यात आले आहे. तब्बल २० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कळवा पोलीस ठाण्यासाठी हद्दीत जागा उपलब्ध झाली असून पारसिकनगर भागात हे पोलीस ठाणे उभे राहणार आहे.
सद्यस्थिती : गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात कळवा पोलीस ठाणे उभारण्याच्या कामाचे भूमिपूजन झाले असून त्याचे काम लवकरच पूर्ण होणार आहे.
कळव्यात नाटय़गृह
कळवा आणि मुंब्रा परिसरातील रहिवाशांना मनोरंजनासाठी कोणतीही ठोस सुविधा गेल्या अनेक वर्षांत उपलब्ध करण्यात आलेली नाही. आर. ए. राजीव यांच्या आयुक्तपदाच्या कार्यकाळात या ठिकाणी नाटय़गृह उभारण्याच्या हालचालींना जोर आला. यासाठी कळव्याच्या मध्यभागी सुमारे १२,७०० चौरस मीटरचा विस्तीर्ण असा भूखंड आरक्षित करण्यात आला आहे.
सद्यस्थिती : ठाणे महापालिकेच्या तिजोरीत सध्या खडखडाट असल्याने यंदाच्या अर्थसंकल्पात कळवा नाटय़गृहासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे कळवा नाटय़गृह बांधण्याच्या कामास मान्यता मिळाली असली तरी यंदाच्या वर्षी हे काम सुरू होईल का, याविषयी पुरेशी स्पष्टता नाही.
मासळी बाजार
खारेगाव, कळवा, गावदेवी मार्केट आणि विटावा आदी भागांत मासळी बाजाराची (फिश मार्केट) दुरवस्था होती. त्यामुळे या भागात आधुनिक पद्धतीचा मासळी बाजार उभारण्यात येणार असून त्यासाठी राष्ट्रीय मात्स्यिकी विकास बोर्डाने ९० टक्के निधी दिला आहे.
सद्यस्थिती : मासळी बाजार बांधण्याची प्रक्रिया पालिकेमार्फत अंतिम टप्प्यात आहे. यासंबंधीच्या एकत्रित प्रस्तावाला सर्वसाधारण सभेत मंजुरी घेण्यात आली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन स्थायी समितीच्या मंजुरीने या कामास प्रत्यक्ष सुरुवात होऊ शकणार आहे.