08 July 2020

News Flash

टिटवाळय़ावर प्रदूषणाचे मळभ!

‘निरी’च्या अहवालात कल्याणमधील २५ अतिप्रदूषित भागांत समावेश

‘निरी’च्या अहवालात कल्याणमधील २५ अतिप्रदूषित भागांत समावेश

आशीष धनगर, लोकसत्ता

कल्याण : डोंगर आणि हिरवाई यांमुळे निसर्गरम्य भाग समजले जाणारी कल्याणमधील टिटवाळा, आंबिवली ही उपनगरेही नागरीकरणाच्या रेटय़ामुळे प्रदूषणाच्या विळख्यात सापडू लागली आहेत. ‘निरी’ या संस्थेने कल्याण आणि डोंबिवली या शहरांतील वायुप्रदूषणाची पाहणी करून एक अहवाल तयार केला आहे. या अहवालात आढळलेल्या २५ अतिप्रदूषित परिसरांत टिटवाळा, आंबिवली आणि सापे या भागांचाही समावेश करण्यात आला आहे.

डोंबिवली आणि कल्याणचा काही भाग प्रदूषित असल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे. असे असले तरी डोंबिवलीपुरते हे प्रदू्षत मर्यादित राहिलेले नाही. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने निरी संस्थेच्या माध्यमातून शहरातील प्रमुख ठिकाणांच्या हवा प्रदूषणाचे सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणात शहरातील २५ ठिकाणे ही सर्वाधिक प्रदूषित असल्याची माहिती समोर आली आहे. वाढलेली बांधकामे आणि रस्त्यावर वाढलेल्या वाहनांची संख्या यामुळे शहरातील प्रदूषण वाढल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. समावेश असलेल्या २५ ठिकाणांपैकी अनेक ठिकाणी नव्याने गृहसंकुले उभी राहात आहेत. तर उर्वरित ठिकाणे हे शहरातील मुख्य रस्ते असून त्या रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. या सर्व ठिकाणांच्या हवा प्रदूषणाचा निर्देशांक ५० ते ७५ टक्क्यांच्या दरम्यान असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने हा अहवाल महापालिकेला सादर केला आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत असणारा टिटवाळा, अंबिवली आणि शहाड हा भाग पूर्वी निसर्गरम्य परिसर म्हणून ओळखला जात असे. या ठिकाणची हवा चांगली आणि घरे परवडण्याजोगी असल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना या ठिकाणी घरखरेदीकडे ओढा वाढत आहे. मात्र, यांमुळे या भागांत मोठय़ा प्रमाणात बांधकामे होत आहेत. तसेच  येथील वाहनांचे प्रमाणही वाढले आहे. परिणामी हे परिसरही आता प्रदूषित होऊ लागले आहे. ‘निरी’च्या अहवालातून हीच बाब अधोरेखित करण्यात आली आहे.

अतिप्रदूषित ठिकाणे

कल्याण-बदलापूर रस्ता, कल्याण शिळफाटा रस्ता, सुभाष रोड, शंकेश्वर रोड, एच-एन रोड, ओमेगा इंडस्ट्री, के. बी.  इंडस्ट्री, डॅस्कम इंडस्ट्री, केडीएमसी वॉटर प्लॉन्ट, सिनेमॅक्स, मच्छी मार्केट, गणेशनगर, हनुमाननगर, ठाकुरवाडी, बिर्ला महाविद्यालय, आयकॉन रुग्णालय, रेल्वे स्थानक परिसर, कोपर रेल्वे स्थानक परिसर, कल्याण निर्मल रस्ता, दुर्गाडी चौक,  टिटवाळा अंबिवली रस्ता आणि कल्याण सापे रस्ता ही सर्व ठिकाणे सर्वाधिक प्रदूषित असल्याचे या अहवालातून समोर आले आहे.

शहरातील काही ठिकाणी प्रदूषण वाढले आहे. हे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका उपाययोजना करत आहे.

– गोपाल भांगरे, उपअभियंता, कल्याण-डोंबिवली महापालिका.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2020 3:05 am

Web Title: titwala face air pollution problem zws 70
Next Stories
1 दिवा, मुंब्य्राचा कर आखडताच!
2 ठाणेकरांचे दिवसभर पाणीहाल
3 जूचंद्रला पाणीटंचाईच्या झळा?
Just Now!
X