08 August 2020

News Flash

ठाण्यात नवा खाडी पूल

अलिबाग-विरार महामार्ग ठाण्याला जोडण्याच्या हालचालींना वेग

प्रतिनिधिक छायाचित्र

अलिबाग-विरार महामार्ग ठाण्याला जोडण्याच्या हालचालींना वेग

जयेश सामंत, ठाणे

मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने आखलेला अलिबाग ते वसई-विरार महामार्ग थेट ठाण्यापर्यंत जोडण्याच्या हालचालींना वेग आला असून उल्हास नदीवर ४०० मीटर लांबीचा पूल बांधून खारबाव ते घोडबंदर मार्गावरील कासारवडवली दरम्यान नवा मार्ग उभारण्याची तयारी ठाणे महापालिकेने सुरू केली आहे. याच भागात नवीन ठाणे शहर उभारण्याचा प्रस्ताव आयुक्त संजीव जयस्वाल यांनी यापूर्वीच महानगर प्राधिकरणापुढे मांडला आहे. त्यामुळे अलिबाग ते वसई-विरार महामार्गात घोडबंदर ते मोघरपाडा असा ४० मीटर रुंदीचा रस्ता प्राधिकरणाने प्रस्तावित केल्यामुळे महापालिकेने नव्या खाडी पुलाची आखणी सुरू केली आहे.

राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या बैठकीत नियोजित महामार्ग थेट ठाणे शहरास जोडावा, असा आग्रह धरला होता. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने अलिबाग ते वसई-विरार असा मल्टिमॉडेल कॉरिडॉर प्रस्तावित केला असून तो भिवंडीलगत असलेल्या खारबाव या गावातून पुढे जातो. खारबावलगत हा मार्ग घोडबंदर मार्गास जोडला जावा यासाठी महानगर प्राधिकरणाने यापूर्वीच विकास आराखडय़ात ४० मीटर रुंदीचा रस्ता प्रस्तावित केला आहे. हे नियोजन लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने यापूर्वीच या परिसरात नवीन ठाण्याचा नियोजनबद्ध आराखडा तयार केला जाऊ शकतो, असा प्रस्ताव मुंबई महानगर विकास प्राधिकरणापुढे मांडला आहे.

अलिबाग-वसई-विरार नियोजित महामार्ग थेट ठाण्यातील घोडबंदर मार्गापर्यंत जोडायचा असेल तर त्यासाठी उल्हास नदीवर पूल बांधण्याची आवश्यकता आहे. या पुलाची बांधणी महापालिकेमार्फत केली जावी, असा महानगर विकास प्राधिकरणाचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावित पुलामुळे तसेच जोडरस्त्यामुळे भविष्यात या भागात विकासास चालना मिळेल तसेच ठाण्यातील अंतर्गत वाहतुकीला नवा पर्याय उपलब्ध होईल, असे महापालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.

अलिबाग ते वसई-विरार हा मल्टिमॉडेल कॉरिडॉर ठाण्याशी जोडला जावा, यासाठी गेल्या काही वर्षांपासून आग्रह राहिला आहे. उल्हास नदीवर उड्डाणपूल उभारल्याने खारबाव ते कासारवडवली अशी नवी मार्गिका उपलब्ध होईलच शिवाय ठाण्यापलीकडे नियोजित असलेल्या नवीन शहरांच्या उभारणीतही हा पूल महत्त्वाची भूमिका बजावू शकेल.

– एकनाथ शिंदे, नगरविकासमंत्री

सल्लागाराची नेमणूक

यासंबंधीच्या आखणीस सुरुवात व्हावी यासाठी महापालिका स्तरावर प्रयत्न सुरू झाले असून कासारवडवली ते खारबाव जोडणारा उल्हास नदीवरील पूल बांधण्यासाठी सल्लागार नियुक्तीचा प्रस्ताव अभियंता विभागाने तयार केला आहे. या नवीन पुलाच्या बांधणीत कांदळवनांचा अडथळा उभा राहणार आहे. त्यामुळे सर्वेक्षण करणे, प्रस्ताव तयार करणे, कांदळवनातील बांधकाम मार्गिका उभारण्यासाठी वन विभागाच्या आवश्यक परवानग्या मिळवणे यांसंबंधीचा प्रस्ताव तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे, अशी माहिती महापालिकेतील वरिष्ठ सूत्रांनी दिली. या पुलाची उभारणी तसेच जोडरस्त्यांच्या बांधणीसाठी काही प्रमाणात भूसंपादनही करावे लागेल, असेही सूत्रांनी सांगितले. त्याचे स्वतंत्र सर्वेक्षण करण्याच्या सूचना सल्लागारास दिल्या जाणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 4, 2020 3:53 am

Web Title: tmc started planning new bridge over creek in thane
Next Stories
1 थकीत देयक वसुलीसाठी ‘सवलत’
2 काळू धरणाची वाट खडतरच
3 ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ उत्साहात
Just Now!
X