ठाण्यातील ‘मार्जिनल स्पेस’ ताब्यात घेण्याच्या निर्णयाला तूर्त स्थगिती; जागा ताब्यात घेतल्यास मतदार विरोधात जाण्याची भीती

ठाणे शहरातील फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटवून रस्त्यांचे रुंदीकरण करण्याच्या महापालिका प्रशासनाच्या निर्णयामुळे एकीकडे नागरिकांतून समाधान व्यक्त होत असताना, आता हाच मुद्दा पालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीच्या चिंतेचा विषय बनला आहे. जुन्या ठाणे शहरातील गोखले रस्ता, खोपट ते कॅडबरी जंक्शन, लालबहादूर शास्त्री मार्ग या रस्त्यांलगत असलेल्या इमारतींच्या आसपासची जागा (मार्जिनल स्पेस) ताब्यात घेऊन रस्ते रुंद करण्याच्या पालिकेच्या योजनेमुळे या परिसरातील दुकानदार, व्यापारी तसेच रहिवाशांमध्ये नाराजी आहे. हा परिसर शिवसेना-भाजपचा बालेकिल्ला मानला जात असल्याने अशी कारवाई झाल्यास मतदारवर्ग दुखावला जाऊन आगामी महापालिका निवडणुकीत फटका बसू शकतो, अशी धास्ती सेना-भाजपच्या नेत्यांना वाटू लागली आहे. त्यामुळेच स्थायी समिती सभेत गुरुवारी यासंदर्भात मांडण्यात आलेला प्रस्ताव १५ दिवसांसाठी स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

जुन्या ठाणे शहराच्या केंद्रस्थानी असलेल्या स्थानक परिसरातील रस्ते अरुंद असून या ठिकाणी वाहने उभी करण्यासही फारशी जागा राहिलेली नाही. त्यामुळे नौपाडा, पाचपाखाडी, खोपट, घंटाळी, तलावपाळी यांसारख्या भागात दररोज मोठी वाहनकोंडी होत असते. या पाश्र्वभूमीवर ठाणे महापालिका प्रशासनाने शहरातील प्रमुख रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काही प्रस्ताव तयार केले आहे. रुंदीकरण करत असताना इमारतीलगतच्या जागा संपादित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने यासंबंधी नागरिकांच्या हरकती, सूचना मागविण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली होती. मात्र हरकती, सूचनांवर स्थायी समितीची मोहर उमटण्यापूर्वीच अभियांत्रिकी विभागाने काही रस्त्यांची कामे सुरू केली, तर काहींच्या निविदाही उरकून टाकल्याने रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे.

महापालिकेने शहरातील ज्या रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी मार्जिनल जागांचे संपादन करण्याचा निर्णय घेतला आहे त्या भागात वर्षांनुवर्षे शिवसेना-भाजपचे एकहाती वर्चस्व राहिले आहे. नौपाडा, पाचपाखाडी, खोपट, बी केबिन परिसरांत या दोन पक्षांचे नगरसेवक मोठय़ा संख्येने निवडून येत असतात. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत या भागांतून भाजपला मोठे मताधिक्य मिळाले. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत या पट्टय़ावर भाजपचे विशेष लक्ष आहे. असे असताना इमारतीलगतच्या जागा संपादित करून रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव प्रशासनाने मांडल्याने या दोन्ही पक्षांचे नेते गांगरले असून या प्रस्तावाचे कोणते राजकीय परिणाम होतील, याचा अभ्यास करू लागले आहेत.

नौपाडा, विष्णुनगर यांसारख्या परिसरातील शेकडो व्यापाऱ्यांची जागा रुंदीकरणासाठी संपादित केली जाणार आहे. रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या गोखले मार्गासारख्या महत्त्वाच्या रस्त्यावरील व्यापाऱ्यांनी यापूर्वीही रस्ते रुंदीकरणासाठी जागा देऊ केल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा अशाच स्वरूपाचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याने या भागातील व्यापारी तसेच काही नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. या पाश्र्वभूमीवर असल्याने शहर विकास विभागाने गुरुवारी स्थायी समितीत मांडलेला यासंबंधीचा प्रस्ताव १५ दिवसांसाठी तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात आला. आमच्या मतदारसंघातील व्यापाऱ्यांसोबत आधी चर्चा करू द्या, मगच हा प्रस्ताव मंजूर करू, असा पवित्रा या वेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक विलास सामंत यांनी घेतला. त्यास भाजपचे सभापती संजय वाघुले यांनीही तात्काळ मान्यता दिली.