आधीच रस्ता अरुंद, त्यात रस्त्याच्या दुतर्फा वाहनांचे ‘पार्किंग’

ठाणे शहरात नव्याने उभ्या राहणाऱ्या उड्डाणपुलांच्या कामामुळे वाहनचालकांना आधीच कोंडीचा सामना करावा लागत असताना, या कामासाठी महापालिका आणि मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने उभारलेल्या बॅरिकेटस्चा आडोसा घेऊन मोठय़ा संख्येने वाहने उभी केली जाऊ लागल्याने या बेकायदा वाहनतळामुळे मुख्य मार्गावर मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. गोखले मार्गाला दुभाजून सरस्वती शाळेच्या दिशेने जाणाऱ्या महात्मा गांधी रस्त्यावर जागोजागी असे कोंडीचे दृश्य दिसू लागले आहे. विशेष म्हणजे, ठाण्याच्या वाहतूक सुलभीकरणाच्या बाता मारणाऱ्या वाहतूक पोलिसांचे या पार्किंगकडे दुर्लक्ष होत आहे.

ठाणे शहरातील गोखले मार्ग, महात्मा गांधी मार्ग तसेच लाल बहादूर शास्त्री मार्गावर नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असते. रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाण्यासाठी हे सर्व मार्ग महत्त्वाचे आहेत. त्यामुळे शहरातील वाहतुकीचा मोठा लोंढा दिवस-रात्र या मार्गाने येजा करत असतो. मूळ शहरात रस्ता रुंदीकरणास फारसा वाव राहिलेला नाही. गोखले मार्गाच्या रुंदीकरणासाठी येथील व्यापाऱ्यांकडून महापालिकेने आधीच जागा घेतली आहे. त्यामुळे रेल्वे स्थानक रस्त्याप्रमाणे या भागात रस्ता रुंदीकरणाला वावही नाही. त्यामुळे महापालिकेने शहरातील तीन प्रमुख ठिकाणी उड्डाणपुलांची उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने सुमारे २२७ कोटी रुपयांचा निधी देऊ केला आहे. शहरातील अरुंद रस्त्यांवर पुढील काही वर्षे उड्डाणपुलांची कामे सुरू राहणार असल्याने या ठिकाणी वाहतुकीचे नियोजन करण्याचे मोठे आव्हान वाहतूक पोलिसांना पेलावे लागणार आहे. मुळात या उड्डाणपुलांच्या उभारणीची आवश्यकता होती का, असा सवालही नागरिकांनी यापूर्वी उपस्थित केला आहे. असे असताना काम सुरू होण्याच्या पहिल्या टप्प्यातच जागोजागी कोंडी होऊ लागल्याने पुढे काय होईल या भीतीने वाहनचालक हैराण झाले आहेत.

सरस्वती शाळा परिसर कोंडीमय

गोखले मार्गाला भेदून सरस्वती शाळेच्या दिशेने जाणारा महात्मा गांधी रस्ता हा नेहमीच वाहनांनी गजबजलेला असतो. या ठिकाणी उड्डाणपुलांच्या कामासाठी महापालिकेने संरक्षक अडथळे उभारले आहेत. या रस्त्याच्या एका कडेला मोठय़ा संख्येने वाहने उभी केली जात असतात. हा संपूर्ण परिसर व्यावसायिक केंद्र असल्याने त्या ठिकाणी येणारे रहिवासी कडेला वाहने उभी करतात. असे असताना रस्त्याच्या एकाच मार्गिकेवर दोन्ही बाजूंना वाहने उभी राहू लागल्याने या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर कोंडी होऊ लागली आहे.