ठाणे जिल्हा परिषदेचा लोकसहभागातून उपक्रम

यंदा राज्यात पाऊस कमी पडल्याने दुष्काळचे सावट असतानाच जलयुक्त शिवार योजनेंतर्गत ठाणे जिल्हा परिषदेने एका महिन्यात लोकसहभागातून तब्बल ८०५ वनराई बंधारे बांधले आहेत. या बंधाऱ्यांच्या माध्यमातून ५५१ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध करून दिला आहे. विशेष म्हणजे, जिल्हा परिषद आणि शासनाचा कोणताही निधी खर्च न करता विद्यार्थी तसेच ग्रामस्थांच्या मदतीने सुमारे एक कोटींची ही कामे करण्यात आली आहेत. यानिमित्ताने जिल्हा परिषदेने राज्यापुढे नवा आदर्शही निर्माण केला आहे.
ठाणे जिल्ह्य़ात लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्याच्या कामाला आक्टोबर महिन्यात सुरुवात झाली. गावागावातील नदी-नाले-ओढय़ांमध्ये सिमेंटच्या गोण्या टाकून वाहणारे पाणी अडविण्यात आले. जिल्हा परिषद आणि शासनाचा कोणताही निधी खर्च न करता ही बंधाऱ्यांची मोहीम राबविण्यात आली असून त्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समित्याच नव्हे तर महात्मा गांधी रोहयो, लघु पाटबंधारे, स्थानिक लोकप्रतिनिधी, बचत गटातील महिला, ग्रामस्थ, जिल्हा परिषद कर्मचारी संघटना आदींनी पुढाकार घेतला. जिल्हा परिषदेचे उपमुख्य अधिकारी व या उपक्रमाचे प्रमुख अधिकारी अशोक पाटील आणि त्यांचे सहकारी या कामांवर केवळ लक्ष ठेवून नाहीत तर प्रत्यक्ष जागेवर जाऊन श्रमदानाने बंधारेही बांधत आहेत. या सर्व उपक्रमाची माहिती देण्यासाठी ठाणे जिल्हा माहिती कार्यालय आणि ठाणे जिल्हा परिषद यांनी शुक्रवारी संयुक्तरीत्या दौरा काढला होता. पाच तालुक्यांत ८०५ बंधारे बांधण्याचे काम पूर्ण झाले असून बंधाऱ्यांचा आकडा लवकरच एक हजारांपर्यंत पोहोचेल, अशी माहिती अशोक पाटील यांनी दौऱ्यादरम्यान दिली. मुरबाड २४०, शहापूर २०९, भिवंडी १८१, कल्याण ९४, अंबरनाथ ८१ अशी तालुकानिहाय वनराई बंधारे बांधण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. या बंधाऱ्यांमुळे अडविल्या गेलेल्या पाण्यावर ग्रामस्थांनी भाजीपाला लागवड केली असून रब्बी पिकालादेखील याचा फायदा होत आहे. शेतीची कामे करणाऱ्या जनावरांना पाणी मिळत आहे तर जंगलातील इतर पशू-पक्षी यांनादेखील पाणी मिळू लागले आहे.