भातसा धरणातील तांत्रिक बिघाडामुळे दोन दिवस ६० टक्के पाणीकपात; रविवापर्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा

ठाणे महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणाच्या पाणी विसर्ग झडपेत गेल्या दोन दिवसांपासून तांत्रिक बिघाड झाला असून या  दुरुस्ती कामाच्या पाश्र्वभूमीवर शुक्रवापर्यंत शहरात ६० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. तसेच दुरुस्ती कामानंतर पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी पुढील एक ते दोन दिवसांचा अवधी लागणार आहे. यामुळे गेल्या दोन दिवसांपासून शहरात निर्माण झालेलीे पाणीटंचाईची समस्या आणखी एक ते दोन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, या पाणीटंचाईची सर्वाधिक झळ घोडबंदर भागाला बसली असून येथील बडय़ा गृहसंकुलातील रहिवाशांना टँकरच्या पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये चार स्रोतांमार्फत दररोज ४८० दशलक्षलिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामध्ये स्टेम प्राधिकरण, महापालिका स्वत:ची पाणीपुरवठा योजना, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि मुंबई महापालिका या स्रोतांचा समावेश आहे. हे स्रोत भातसा आणि बारवी नदीतून पाणी उचलून शहरात पुरवठा करतात. मंगळवारी दुपारी भातसा धरणाची पाणी विसर्ग झडप उघड-बंद होण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. यासाठी बुधवारी सकाळी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून त्यानंतर पिसे बंधाऱ्यात पाणी सोडण्यात आले. परंतु, धरणातून होणारा पाणीपुरवठा बंद असताना महापालिकेने पिसे बंधाऱ्यातील मातीचा गाळ काढला. त्यामळे धरणातून पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर बंधाऱ्यातील पाणी साठय़ाची पातळी नेहमीपेक्षा खाली गेली. ही पातळी कमी झाल्याने विद्युत पंपाने पुरेसे पाणी खेचणे शक्य झाले नाही. चारपैकी एका पंपाने पाणी खेचणे शक्य झाले असनू यामुळे शहरात ६० टक्के पाणीकपात झाली आहे.

दुरुस्तीचे काम बुधवारी दुपारी पूर्ण करण्यात आले असले तरी बंधाऱ्यातील खालावलेल्या पाणी पातळीमुळे शहरात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे विद्युत पंप पाणी खेचू शकतील इतका पाणी साठा धरणातून सोडण्याची विनंती महापालिकेने पाटबंधारे विभागाला केली आहे. याशिवाय जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पाणी समस्येचा आढावा घेऊन पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना विद्युत पंप पाणी खेचू शकतील इतका पाणी साठा धरणातून सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे गुरुवारी रात्री उशिरापर्यंत पाटबंधारे विभागाकडून बंधाऱ्यात पुरेसा पाणी साठा सोडण्यात येणार आहे. त्यामुळे शुक्रवापर्यंत शहरात ६० टक्के पाणीकपात लागू राहणार आहे.

मुंबईलाही फटका

पिसे बंधाऱ्यातून मुंबई महापालिकाही पाणी उचलते. भातसा धरणाच्या पाणी विसर्ग झडपेतील तांत्रिक बिघाडामुळे मुंबई महापालिकेला पुरेसे पाणी उचलणे शक्य होत नसून यामुळे मुंबईतही पाणीकपात लागू करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या भातसा पाणी स्रोतामधून ठाणे शहराला ६० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येत असून मुंबई महापालिकेने हा पुरवठा तात्पुरता बंद केला आहे. त्यामुळे ठाण्यातील कोपरी, पाचपाखाडी आणि अंबिकानगर भागाचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. तसेच शहरात ४८० दशलक्ष लिटरऐवजी केवळ २०० दशलक्ष लिटर इतकाच पाणीपुरवठा होत आहे.

नियमित पाणीकपात रद्द

महापालिका आणि स्टेम प्राधिकरण या दोन्ही स्रोतांची मुख्य जलवाहिनी साकेत येथे जोडण्यात आली आहे. जोडणीच्या ठिकाणी पाण्याची गळती होत असल्यामुळे त्याच्या दुरुस्तीचे काम शुक्रवारी हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे पाालिकेने बुधवारची पाणीकपात रद्द करून ती शुक्रवारी लागू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र भातसा धरणाच्या पाणी विसर्ग झडपेतील तांत्रिक बिघाडामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन शुक्रवारची पाणी कपात रद्द  करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

इंदिरानगरमध्ये आधीच टंचाई

सोमवारी रात्री झालेल्या पावसामुळे इंदिरानगर, सावरकरनगर, लोकमान्यनगर या भागात विद्युतपुरवठा खंडित झाला होता. यामुळे येथील पाणीपुरवठय़ाचे नियोजन कोलमडले होते. त्यात मंगळवारपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. या भागात गेल्या दोन दिवसांपासून पाणीटंचाई आहे. त्यामुळे याठिकाणी पाणीकपात असतानाही पालिकेने गुरुवारी पुरेसे पाणी सोडण्याचा प्रयत्न केला आहे.