दोन हजार सीसीटीव्हीदेखील बसवणार

‘स्मार्ट सिटी’ योजनेचा एक भाग म्हणून ठाणे शहरात सार्वजनिक ठिकाणे तसेच रस्त्यांवर एकूण दोन हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या महापालिकेच्या प्रस्तावास स्थायी समितीने बुधवारी मंजुरी दिली. तसेच ठाणेकरांना विनासायास इंटरनेट सुविधा मिळावी यासाठी संपूर्ण शहर ‘वायफाय’युक्त करण्याचा निर्णयही पालिकेने घेतला असून त्यालाही समितीची मंजुरी मिळाली आहे. यासाठी संबंधित ठेकेदाराला सहा महिन्यांची मुदत देण्यात आली असली तरी, आगामी पालिका निवडणूक लक्षात घेता, पुढील दोन ते तीन महिन्यांतच या दोन्ही गोष्टी प्रत्यक्षात पूर्ण केल्या जातील, अशी माहिती पालिकेली विश्वसनीय सूत्रांनी दिली. शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्याने गुन्हेगारीवर वचक ठेवणे शक्य होणार आहे. शिवाय, या कॅमेऱ्यांच्या मदतीने शहरातील वाहतुकीचे नियंत्रणदेखील करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेत सहभागी नसलेल्या ठाणे शहराला ‘स्मार्ट सिटी’ करण्यासाठी पालिका प्रशासनानेच ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली असून त्यासाठी शहरामध्ये विविध प्रकल्प राबवण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून शहरातील सार्वजनिक ठिकाणे तसेच रस्ते येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्याचबरोबर संपूर्ण शहर वायफाययुक्त करण्याचा प्रस्तावही प्रशासनाने आणला होता. या दोन्ही प्रस्तावांना सर्वसाधारण सभेनेही मान्यता दिली होती. याबाबतची निविदा प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली असून निविदा भरणाऱ्या कंपन्यांनी काम करण्यास संमती दर्शविली आहे. त्यासंबंधीचा प्रस्ताव बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत अंतिम मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. त्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याने शहरात सी सीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा आणि शहर ‘वाय-फाय’युक्त करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पहिल्या टप्प्यात संपूर्ण शहरात १६०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून त्यासाठी प्रभाग सुधारणा निधी वापरण्यात येणार आहे. प्रभागामध्ये कुठे कॅमेरे बसविणे गरजेचे आहे, याची यादी नगरसेवकांकडून घेतली जाणार आहे. त्याआधारे हे कॅमेरे त्यांच्या प्रभागात बसविले जाणार आहेत. दुसऱ्या प्रस्तावात ठाणे, कळवा, मुंब्रा शहरातील ४०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. याच कॅमेऱ्यांसोबत वाय-फाय यंत्रणा बसविण्यात येणार आहे. शहरात बसविण्यात येणारे सीसीटीव्ही कॅमेरे ठाणे पोलीस नियंत्रण कक्ष तसेच स्थानिक पोलीस ठाण्याला जोडण्यात येणार आहे. दरम्यान, महापालिकेच्या प्रभाग समित्यांमध्येही कॅमेरे जोडण्यासाठी नियंत्रण कक्ष तयार करण्याची मागणी नगरसेवकांनी केली असून त्याचाही विचार महापालिका प्रशासनाने करण्याचे मान्य केले आहे.

वायफाय सेवा अशी

  • संपूर्ण ठाणे शहरात वायफायद्वारे इंटरनेट सुविधा पुरवण्यात येणार आहे.
  • ही सेवा घेण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे नोंदणी करावी लागणार आहे.
  • त्यासाठी शंभर रुपये इतके शुल्क भरावे लागणार आहे.
  • ८०० केबीपीएसपर्यंतचा स्पीड असलेल्या इंटरनेटचा वापर नोंदणीधारकास विनामूल्य करता येऊ शकेल. त्यापेक्षा जास्त स्पीड किंवा वापरासाठी अतिरिक्त पैसे महापालिकेकडे भरावे लागतील.