ठाणे : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी १० गावातील नागरिकांचे पुनर्वसन करण्यात आले होते. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. या विमानतळ उभारणीसाठी उठवण्यात आलेल्या गावांचे उलवे नोडमध्ये पुनर्वसन करण्यात आले असून उद्घाटनापुर्वी प्रकल्पग्रस्तांनी भावना व्यक्त केल्याचे दिसून आले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीसाठी पुनर्वसन झालेल्या १० गावांचा आता कायापालट झाला आहे. एकेकाळी अंधारात जगणारी, वीज-पाणी-अभ्यास यांची वानवा असलेल्या या गावांचा विकास झाला आहे. मोदी सरकार आणि राज्य सरकारच्या प्रयत्नांमुळे या गावांचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलला असल्याच्या भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. “पूर्वी आमच्या खेडेगावात वीज नव्हती, पाणी नव्हते, शिक्षणाची सोय नव्हती. पण आज आम्ही आनंदात आहोत. कारण आम्हाला तीन पटीने जागा मिळाली.

जागा मिळाल्यानंतर विकासकाला दिली आणि आज आमच्या इमारती उभ्या राहिल्या. आज आम्ही शहरात राहतो, आर्थिकदृष्ट्या सक्षम आहोत,” अशी भावना एका ग्रामस्थाने व्यक्त केली. ग्रामस्थांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. विशेष म्हणजे, “विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय हा लोकांच्या भावना जपणारा आहे,” असे मत अनेक ग्रामस्थांनी नोंदवले.

शिक्षण आणि आरोग्याची नवी दारे

१५ वर्षांपूर्वी गावातील विद्यार्थ्यांना कॉलेजसाठी १५ ते २० किलोमीटर प्रवास करावा लागत असे. आज पुनर्वसनामुळे दोन किलोमीटर अंतरावरच कॉलेज उपलब्ध आहे. तसेच आजारी पडल्यास २५ ते ३० किलोमीटर अंतर पार करून उपचार घ्यावे लागत, पण आता १-२ किलोमीटरवरच आधुनिक रूग्णालये उपलब्ध झाले असल्याचे नागरिकाने सांगितले. गावातल्या नव्या पिढीला आता सीबीएसई माध्यमातील शाळांमध्ये शिकण्याची संधी मिळाली आहे. “पूर्वी हे फक्त स्वप्न होतं, आता वास्तव आहे,” अशी भावना तरुण पालकांनी व्यक्त केली.

कुडाच्या घरातून सात मजल्यांच्या इमारतींपर्यंत“जन्म झाला तेव्हा कुडाचे घर होते, आता मात्र सात मजल्यांच्या इमारतीत राहतो. सिडकोने अत्यंत चांगल्या पद्धतीने पुनर्वसन केले. आम्ही सर्व समाधानी आहोत,” असे ग्रामस्थ सांगतात. तसेच मंदिरे, रस्ते, सार्वजनिक सुविधा, वाहतुकीची साधने या सगळ्या सोयी आता सहज उपलब्ध आहेत. गावातून शहरात स्थलांतर झाल्याने जीवनमान सुधारले असल्याचे अनेकांनी सांगितले.

नव्या शहरात, जुन्या आठवणींसोबत

काही ग्रामस्थांना मात्र गावातील आपुलकी आणि नातेवाईकांच्या जवळीकीची ओढ आहे. “गावातली मजा काही वेगळीच होती, शहरात ती नाही. नातेवाईक, शेजारी दूर गेले,” अशी भावना काही महिलांनी व्यक्त केली.