लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : ठाणे शहरात सुमारे १०० एकर वन जमिनीचा घोटाळा झाला आहे. शंभर एकरची वन जमीन अवघ्या ३१ कोटींमध्ये विकण्यात आली असून त्यामध्ये अधिकारी, एका ट्रस्टचा ट्रस्टी आणि बिल्डर यांचा सहभाग आहे असा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. लवकरच या घोटाळ्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे आव्हाड यांनी ‘एक्स’ पोस्टमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा-शिवाजी चौकातील कार्यक्रमांमुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांचे आवाहन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी एक्सवर एक पोस्ट केली आहे. “ठाण्यामध्ये येत्या काही दिवसांतच एक मोठा घोटाळा उघडकीस येणार आहे.महाराष्ट्र राखीव वने असलेली जमीन एका मोठ्या ट्रस्टच्या मुख्य ट्रस्टीने विकण्याचे कारस्थान केले आहे आणि त्यामध्ये सगळे अधिकारीही सामील झालेले आहेत. ३१ कोटी रूपयांमध्ये ही जमीन विकण्यात आलेली आहे. पण, राखीव वने विकण्याचा अधिकार कोणाला आहे? त्यास परवानगी देण्याचा अधिकार कोणाला आहे? अन् यामध्ये ट्रस्टी, परवानगी देणारे, विकत घेणारे या सर्वांनी मिळून हा घोटाळा केला आहे. हा घोटाळा लवकरच संपूर्ण कागदपत्रांसह कायदेशीररित्या उघड केला जाईल आणि याबाबत उच्च न्यायालयात याचिकादेखील दाखल करण्यात येईल. जवळपास १०० एकर पेक्षा अधिक ही जमीन असून या ट्रस्टचे अनेक फ्रॉड पोलिसांनी पकडलेले आहेत. ही जमीन कोणाची असेल, हे त्या बिल्डरला हे ट्वीट वाचल्या-वाचल्या लगेच समजेल!” असा आरोप त्यांनी ट्विट द्वारे केला आहे. येत्या काही दिवसांत या संदर्भात न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे म्हटले आहे.