ठाणे – महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी परिक्षेचा निकाल उद्या म्हणजेच मंगळवारी जाहीर होणार आहे. ठाणे जिल्ह्यातून १ लाख २१ हजार २४४ विद्यार्थ्यांनी दहावीची परिक्षा दिली होती. ३३८ परिक्षा केंद्रावर ही परिक्षा पार पडली होती. ही परिक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी जिल्हास्तरावर भरारी पथक तैनात करण्यात आले होते. आता, उद्या जिल्ह्यातील किती विद्यार्थी या परिक्षेत उत्तीर्ण होणार आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या वर्षी म्हणजेच सन २०२३ -२४ या शैक्षणिक वर्षात ठाणे जिल्ह्यात दहावीचा निकाल ९५. ५६ टक्के लागला होता. यात, मुलींनी बाजी मारली होती. त्यामुळे २०२४ -२५ या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यात दहावीचा किती टक्के निकाल लागणार, तसेच किती विद्यार्थी उत्तीर्ण होणार आणि यंदाही मुली बाजी मारणार की, मुले याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२४ -२५ या शैक्षणिक वर्षात दहावीच्या परिक्षेसाठी ठाणे जिल्ह्यातून १ लाख २१ हजार २४४ विद्यार्थी परिक्षेला बसले होते. परिक्षा व्यवस्थित पार पडावी यासाठी शिक्षण विभागाच्या अंतर्गत भरारी पथक आणि आवश्यकतेप्रमाणे बैठे पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. या भरारी पथकामध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, निरंतर शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, उपशिक्षणाधिकारी, तज्ज्ञ शिक्षक, प्राध्यापक आणि मुख्याध्यापक यांच्या पथकाचा समावेश होता. तसेच महिला विशेष पथकाचा देखील समावेश असल्याचे पाहायला मिळाले होते.