कल्याण – ठाणे जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचा कणा मानल्या जाणाऱ्या चार तालुक्यांमधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत ६५ जागांसाठी १४६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. राज्याच्या सत्तेत आणि विरोधात असणारे पक्ष वरच्या पातळीवर एकजीव असले तरी बाजार समिती निवडणुकीत युती, आघाडींमध्ये बिघाडी आणि बंडखोरी झाल्याचे चित्र आहे.

येत्या ३० एप्रिलला शहापूर, मुरबाड, भिवंडी, उल्हासनगर बाजार समिती निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी रणरणत्या उन्हात, लग्न सराईच्या हंगामात आपले मोजके कार्यकर्ते घेऊन प्रचार सुरू केला आहे. बाजार समितीच्या निवडणुका या सग्या-सोयऱ्यांच्या निवडणुका म्हणून ओळखल्या जात असल्याने या निवडणुकांमध्ये राज्य, जिल्हा पातळीवर सर्वच पक्षांचे नेते विशेष लक्ष देत नाहीत, अशी माहिती एका राजकीय नेत्याने दिली.

हेही वाचा – गिरणी कामगारांसाठीची रंजनोळीतील घरे दुरुस्तीअभावी धुळखात, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने दुरुस्ती करावी-एमएमआरडीए

भाजपा, शिवसेना (शिंदे गट) युतीत आणि राष्ट्रवादी, काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांच्या महाविकास आघाडीत स्थानिक पातळीवर कोठेही समन्वयाचे वातावरण नाही. बाजार समिती निवडणुकीत इच्छुक उमेदवारांनी आपले स्थानिक पातळीवर ‘बळ’ वापरून निवडणुकीत बाजी मारण्यासाठी तयारी केली आहे. स्थानिक नेते, लोकप्रतिनिधी शह-काटशहाचे राजकारण करून या बिघाडीच्या निवडणुकीत आपले जुने हिशेब चुकते करत आहेत.
भिवंडी बाजार समिती निवडणुकीत १४ जागांवर ३० उमेदवार निवडणूक लढवित आहेत. शहापूर बाजार समिती निवडणुकीत १७ जागांसाठी ४४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. उल्हासनगर बाजार समितीत १७ जागांसाठी २३ उमेदवार, मुरबाडमध्ये १७ जागांसाठी ३९ उमेदवार निवडणूक लढवित आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भिवंडी बाजार समिती निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाचे मनोमिलन झाले होते. परंतु, भाजपामध्ये बंडखोरी झाल्याने युतीच्या उमेदवारांसमोर आव्हान उभे राहिले आहे. महाविकास आघाडीत येथे बंडखोरी झाली आहे. मुरबाड बाजार समितीत भाजपाने सात जागांवर दावा केला होता. शिंदे गटाने सहा जागा देण्याची तयारी दर्शवली होती. जागा वाटपावरून येथे युतीत विसंवाद झाला. आ. किसन कथोरे यांनी मुरबाड बाजार समितीमधील वर्षानुवर्षाची प्रस्थापितांची मक्तेदारी मोडून काढण्याचे आवाहन करत प्रचार सुूरू केला आहे. त्याला सुरुंग लावण्याचे काम आ. कथोरे यांचा एक वरिष्ठ स्पर्धक नेता करत असल्याने मुरबाडमध्ये युतीत बिघाडीचे वातावरण उघडपणे दिसत आहे.

हेही वाचा – डोंबिवलीतील ‘महारेरा’ घोटाळ्यातील सदनिकांची कल्याणच्या सहदुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी, विशेष तपास पथकाचे आदेश दुर्लक्षित

शहापूर बाजार समितीत प्रत्येक उमेदवाराने आपल्या ताकदीवर निवडणूक लढविण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे या समितीवर कोणत्या पक्षाचा झेंडा लागेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.