कळवा येथील रेतीबंदर भागात १५.५८८ किलो गांजा ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने मंगळवारी जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चारजणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १७ लाख ९८ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. सोमेश जयस्वाल (२२) आणि दिपेश जयस्वाल (२२) संदीप पावरा (२१) आणि दिपक जयस्वाल (२०) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

हेही वाचा- ठाणे: पोलिओ लशीची तिसरी मात्रा जानेवारीपासून

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रेतीबंदर परिसरात काहीजण अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनीट एकचे पोलीस शिपाई सागर सुरळकर यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सुरुवातील सोमेश जयस्वाल आणि दिपेश जयस्वाल यांना अटक केली. त्यांच्याकडे पोलिसांना १५. ५८८ किलो वजनाचा गांजा आढळून आला. दरम्यान, पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता, त्यांचे आणखी दोन साथीदार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी संदीप पावरा आणि दिपक जयस्वाल यांनाही अटक केली. याप्रकरणी चौघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून एक मोटार, मोबाईल फोन आणि गांजा असा एकूण १७ लाख ९८ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.