ठाण्याजवळच्या कळवा या ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारांअभावी सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप होत असतानाच १२ तासात १६ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक आणि मन विषण्ण करणारी बातमी समोर आली आहे. यानंतर रुग्णालय प्रशासनावर प्रचंड टीका होते आहे. मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात हे काय चाललं आहे असा प्रश्न इतर पक्षातले लोक विचारत आहेत. या सगळ्या प्रकरणावर त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हटलं आहे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी?

कळवा येथील रुग्णालयात जी घटना घडली त्याची माहिती आम्ही घेत आहोत. ठाण्याचे आयुक्त, आरोग्य अधिकारी यांच्याकडून प्रकरणाची माहिती घेत आहोत. पहिल्यांदा जे रुग्ण गेले त्याचीही माहिती आम्ही घेत आहोत. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीत ते रुग्णालय येतं. मात्र मृत्यू हा मृत्यूच असतो. कशामुळे या रुग्णांचा मृत्यू झाला त्याचा अहवाल दोन दिवसात येईल आणि कारवाई केली जाईल. रुग्णाच्या जिवाशी होणारी हेळसांड आम्ही काहीही झालं तरी सहन करणार नाही.

हे पण वाचा- “कळव्यात मृत्यूचं तांडव, रुग्णांना मरायला…”, एका रात्रीत १६ रुग्ण दगावल्याप्रकरणी मनसे आक्रमक!

या ठिकाणी काय घडलं त्याची माहिती आम्ही घेत आहोत. डीनना याची कल्पना असेल. रुग्णांकडे दुर्लक्ष झालं आहे का? ही बाबही अहवाल आल्यावर स्पष्ट होईल. जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे. पुरोगामी महाराष्ट्रात या अशा प्रकारच्या घटना घडणं सर्वसामान्यांच्या आरोग्याची हेळसांड करणं हे माझ्यासारखा मंत्री मुळीच सहन करणार नाही. ज्यावेळी अहवाल येईल त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने योग्य ती कारवाई केली जाईल.

घटना मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात घडली की गडचिरोलीला घडली की चंद्रपूरला घडली यामध्ये पडू नका. सगळे महाराष्ट्राचे नागरिक आहेत. त्यांची जबाबदारी ही शासनाची आहे. आम्ही शासन म्हणून जबाबदारी घेतली आहे. या घटनेच्या मुळाशी आम्ही जात आहोत. ज्या कुणामुळे घडलं असेल त्यावर कारवाई केली जाणारच असं आज तानाजी सावंत यांनी जाहीर केलं.

शनिवार रात्री १०.३० ते रविवार सकाळी ८.३० या कालावधीत हे रुग्ण दगावले आहेत. त्यातील १३ रुग्णांवर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात तर ३ रुग्णांवर सामान्य कक्षात उपचार सुरू होते. या वृत्तास रुग्णालय प्रशासनाने दुजोरा दिला आहे. काही रुग्ण खासगी रुग्णालयामधून अतिशय अत्यवस्थ अवस्थेत असताना शेवटच्या क्षणी येथे उपचारासाठी दाखल झाले होते तर, काही रुग्णांचे वय ८० पेक्षा जास्त असल्याने वयोवृद्ध असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या जागी सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारणीचे काम सुरू आहे. यामुळे रुग्णांचा भार कळवा रुग्णालयावर वाढला आहे. ठाणे जिल्ह्यातील रुग्ण इथेच येत आहेत. त्या तुलनेत डॉक्टर आणि वैद्यकीय यंत्रणा कमी पडत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे रुग्णाच्या उपचाराचा प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे.