ठाणे : महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचाराअभावी सहा रुग्णांचा मृत्यु झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केल्याचे प्रकरण ताजे असतानाच, गेल्या १२ तासात म्हणजेच शनिवार रात्रीपासून ते रविवार सकाळपर्यंत रुग्णालयात आणखी १६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची बाब समोर आले आहे. यामुळे रुग्णालय प्रशासन पुन्हा टीकेची धनी ठरली आहे. दरम्यान, मृत पावलेल्या काही रुग्ण वयोवृद्ध होते तर काही रुग्णांना खासगी रुग्णालयातून अतिशय अत्यवस्थ अवस्थेत असताना शेवटच्या क्षणी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, असा दावा प्रशासनाने केला आहे.

हेही वाचा >>> ठाण्यात पार पडली ‘वारी समतेची.. वारी मानवतेची’

ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गुरुवारी दिवसभरात सहा रुग्णांचा मृत्यू झाला होता. उपचाराअभावी रुग्णांचा मृत्यु झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी रुग्णालयबाहेर आक्रोश करून गोंधळ घातला होता. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही रुग्णालयात जाऊन प्रशासनाला जाब विचारून संताप व्यक्त केला. या घटनेला दोन दिवस उलटत नाही तोच रुग्णालयात १६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची बाब समोर आले आहे.

हेही वाचा >>> समान नागरी कायद्यामुळे धर्मात-पंथात हस्तक्षेप होणार नाही, केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांचे प्रतिपादन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शनिवार रात्री १०.३० ते रविवार सकाळी ८.३० या कालावधीत हे रुग्ण दगावले आहेत. त्यातील १३ रुग्णांवर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात तर ३ रुग्णांवर सामान्य कक्षात उपचार सुरू होते. या वृत्तास रुग्णालय प्रशासनाने दुजोरा दिला आहे. काही रुग्ण खासगी रुग्णालयामधून अतिशय अत्यवस्थ अवस्थेत असताना शेवटच्या क्षणी येथे उपचारासाठी दाखल झाले होते तर, काही रुग्णांचे वय ८० पेक्षा जास्त असल्याने वयोवृद्ध असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या जागी सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारणीचे काम सुरू आहे. यामुळे रुग्णांचा भार कळवा रुग्णालयावर वाढला आहे. ठाणे जिल्ह्यातील रुग्ण इथेच येत आहेत. त्या तुलनेत डॉक्टर आणि वैद्यकीय यंत्रणा कमी पडत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे रुग्णाच्या उपचाराचा प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे.