उल्हासनगरः पावसानंतर छत गळत असल्याने गळके छत दुरूस्त करण्यासाठी अनेक कुटुंबे छतावर प्लास्टिक किंवा टारपोलिन टाकतात. मात्र घराचे गळके छप्पर दुरूस्त करण्यासाठी गेलेल्या एका १७ वर्षीय तरूणाला विजेचा जोरदार धक्का बसला. यात या तरूणाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने उल्हासनगरच्या शास्त्री नगर परिसरात हळहळ व्यक्त होते आहे. आयुष रॉय असे या तरूणाचे नाव असून तो वडिलांसोबत छतावर गेला होता.
उल्हासनगर अत्यंत दाटीवाटीचे शहर म्हणून ओळखले जाते. शहरातील मोठ्या भागात चाळवजा घरांची संख्या अधिक आहे. यातील अनेक घरांवर पावसाळ्यात पत्रे गळके होतात. त्यामुळे या घरांवर प्लास्टीकचे आवरण किंवा टारपोलीन टाकण्याला पसंती दिली जाते. पावसाळाच्या सुरूवातीला हे आवरण टाकले जाते. मात्र यंदा मे महिन्यातच पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे अनेक घरांवर हे आवरण टाकायचे राहून गेले होते. अशाच एका घटनेत छतावर आवरण टाकताना एका १७ वर्षीय तरूणाला आपला जीव गमवावा लागला आहे.
उल्हासनगर कॅम्प २ येथील शास्त्रीनगर परिसरात पंजाबी कॉलनीमध्ये सोमवारी ही दुर्दैवी घटना घडली. १७ वर्षीय आयुष रॉय हा आपल्या वडिलांसोबत घराच्या गळक्या छतावर प्लास्टिक टाकण्यासाठी गेला होता. तेव्हा त्याचा संपर्क उघड्या विजेच्या तारांशी झाला. त्यामुळे त्याला तीव्र स्वरूपाचा विजेचा धक्का बसला. तिथे जागीच आयुष बेशुद्ध होऊन पडला. त्यानंतर त्याला तातडीने उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेनंतर कुटुंबीयांसह स्थानिक नागरिकांनी महावितरणाच्या निष्काळजीपणावर बोट ठेवले आहे. छतावरून गेलेल्या उघड्या विजेच्या तारांविषयी यापूर्वीच महावितरणकडे तक्रार केली होती. मात्र, त्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही, अशी माहिती आयुषच्या कुटुंबियांनी दिली आहे. कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी पाहणीसाठी घटनास्थळी आला नव्हता. याच निष्काळजीपणामुळे एका निष्पाप तरूणाला बळी गेला, असा संताप नागरिकांनी व्यक्त केला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे.
गुन्हा दाखल करावा
या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता केली जाते आहे. या प्रकरणात वेळीच कारवाई केली नाही तर प्रशासनाविरोधात आंदोलन केले जाईल, असा इशारा स्थानिकांच्या वतीने देण्यात आला आहे. या घटनेनंतर तरी उघड्या वीज वाहिन्यांची दुरूस्ती केली जाईल का, असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.