ठाणे : ठाणे रेल्वे स्थानक येथील बाजारपेठेत एका २१ वर्षीय तरुणीचा रिक्षा चालकाने वियनभंग केल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. तरुणीने या रिक्षा चालकाला पकडण्याचाही प्रयत्न केला. परंतु त्याने तिला फरफटत काही अंतर पुढे नेले. त्यामुळे तरुणीला दुखापतही झाली आहे. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस रिक्षा चालकाचा शोध घेत आहे. काही दिवसांपूर्वीच फेरीवाल्यांनी एका प्रवासी महिलेचा विनयभंग केला होता. त्यानंतर आता रिक्षा चालकाविरोधातही विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

ठाण्यात राहणारी तरुणी ही बाजारपेठ परिसरातून शुक्रवारी सकाळी ७ वाजता पायी जात होती. त्याचवेळी एक रिक्षा चालक त्याची रिक्षा घेऊन बाजारपेठेतून जात होता. या रिक्षा चालकाने तरुणीकडे पाहून अश्लील हावभाव केले. या प्रकारानंतर तरूणीने धाडस दाखवित रिक्षा चालकाला जाब विचारत तसेच त्याला रिक्षातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु रिक्षा चालकाने रिक्षा सुरु केली. तसेच त्याने तरुणीला फरफटत काही अंतर पुढे नेले.

हेही वाचा- “माझी बहीण आणि पत्नी गाडीत नसती तर…” वाहनावरील हल्ल्यानंतर संतोष बांगरांची संतप्त प्रतिक्रिया

तरुणीच्या हाताला दुखापत झाल्याने ती रस्तात पडली. त्यानंतर रिक्षा चालक स्थानकाच्या दिशेने फरार झाला. तिने याप्रकरणाची तक्रार ठाणेनगर पोलीस ठाण्यात दिली. या तक्रारीच्या आधारे रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घटनेचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही दिवसांपूर्वीच ठाणे रेल्वे स्थानकात एका प्रवासी महिलेला फेरीवाल्यांनी महिलेला मारहाण करत तिचा विनयभंग केल्याची घटना ताजी असताना आता रिक्षा चालकांची मुजोरीही वाढू लागल्याने महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.