उल्हासनगरः उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींची यादी नुकतीच उल्हासनगर महापालिका प्रशासनाने जाहीर केली. यात एकूण २६३ इमारतींचा समावेश आहे. तसेच ५१ इमारतींचे संरचनात्मक लेखापरिक्षण झाले नसल्याची बाबही समोर आली आहे. यात दोन इमारती अतिधोकादायक असून एक प्रभाग दोन तर दुसरी प्रभाग चारमध्ये आहे. इमारती रिकामी न करता संंरचनात्मक दुरूस्ती करण्यायोग्य इमारतींची संख्या २०८ इतकी आहे.

उल्हासनगर शहरात गेल्या काही वर्षात कमकुवत झालेल्या जुन्या इमारती, त्यांचे स्लॅब कोसळल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. इमारतींच्या स्लॅब कोसळण्याच्या घटनेत अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. शहरातील पुनर्विकासाचा प्रश्न अजुनही सुटू शकला नसल्याने अजूनही रहिवासी धोकादायक इमारतीत राहतात. पावसाळ्यात अशा स्लॅब कोसळल्याच्या अनेक घटना घडत असतात.

उल्हासनगर महापालिका दरवर्षी अशा धोकादायक इमारतींची यादी जाहीर करत असते. यंदाही नुकतीच उल्हासनगर महापालिकेने धोकादायक इमारतीची यादी जाहीर केली आहे. यात एकूण २६३ धोकादायक इमारतींचा समावेश आहे. ता चार प्रभागातील आणि चार विविध प्रकारातील इमारतींचा समावेश आहे. शहरात एकूण दोन इमारती अति धोकादायक प्रकारातील आहेत. अतिधोकादायक, तात्काळ निष्काशीत करण्यायोग्य आणि राहण्यास अयोग्य अशा या इमारती आहेत. प्रभाग क्रमांक दोन आणि चारमध्ये या दोन इमारती आहेत. यातील प्रभाग चारमधील एका इमारतीत रहिवासी वास्तव्य करत आहेत.

त्याचसोबत इमारत रिकामी करून संरचनात्मक दुरूस्तीची गरज असलेल्या इमारतींची संख्या ३७ इतकी आहे. यात प्रभाग क्रमांक एकमध्ये ७, प्रभाग क्रमांक दोनमध्ये १३, प्रभाग क्रमांक तीनमध्ये १० आणि प्रभाग क्रमांक चारमध्ये ७ इमारती आहेत. तर इमारत रिकामी न करता संरचनात्मक दुरूस्ती करण्याची गरज असलेल्या इमारतींची संख्या २०८ आहे. यात प्रभाग क्रमांक एकमध्ये ७६, प्रभाग क्रमांक दोनमध्ये ५४, प्रभाग क्रमांक तीनमध्ये ५० आणि प्रभाग चारमधअये २८ इमारतींचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक एकमध्ये सर्वाधिक इमारतींचा समावेश आहे. तर किरकोळ दुरूस्तीची गरज असलेल्या कमी धोकादायक इमारतींची संख्या १६ इतकी आहे.

५१ इमारतींचे लेखापरिक्षण नाहीच

उल्हासनगर शहरातील धोकादायक इमारतींची यादी पालिका प्रशासनाने जाहीर केली असतानाच त्यात संरचनात्मक लेखापरिक्षण नसलेल्या इमारतींची संख्या तब्बल ५१ इतकी आहे. प्रभाग क्रमांक एक आणि दोन मध्ये प्रत्येकी १० तर प्रभाग तीन मध्ये ११ आणि प्रभाग चारमध्ये २० इमारतींचा यात समावेश आहे.