ठाणे : जिल्ह्य़ात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून गुरूवारी दिवसभरामध्ये जिल्ह्य़ात २६७ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्य़ातील करोनाबाधितांचा आकडा आता ४ हजार ६७ इतका झाला आहे. तर जिल्ह्यात दिवसभरात ६ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला असून मृतांची एकुण संख्या १४७ इतकी झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे जिल्ह्य़ात गुरुवारी २६७ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये ठाणे शहरातील ९७, नवी मुंबईतील ५८, कल्याण—डोंबिवली शहरातील ४८, भिवंडी शहरातील ५, अंबरनाथ शहरातील १, उल्हासनगर शहरातील १०, बदलापूर शहरातील १३, मिरा-भाईंदर शहरातील १३, आणि ठाणे ग्रामीण मधील २२ रुग्णांचा समावेश आहे. गुरूवारी जिल्ह्य़ात सहा रुग्णांचा करोनामुळे मृत्यु झाला असून त्यामध्ये नवी मुंबईतील २, कल्याणमधील २ तर बदलापूर आणि मीरा भाईंदरमधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

महिला पोलिसाचा बळी

ठाणे शहर पोलीस दलातील महिला पोलीस कर्मचारीचा गुरूवारी सायंकाळी मृत्यू झाला. त्या श्रीनगर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होत्या. यापूर्वीच त्यांचे मूत्रपिंड निकामी झाले होते. त्यामुळे सुमारे महिन्याभरापासून त्या रजेवर होत्या. तसेच गेल्या १२ दिवसांपासून त्यांच्यावर ठाण्यातील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वीच त्यांची करोनाची चाचणी करण्यात आली होती. गुरूवारी दुपारी त्यांचा करोना चाचणीच्या अहवालात आल्यानंतर त्यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. ठाणे शहर पोलीस दलातील करोनामुळे हा पहिलाच बळी आहे. या घटनेनंतर ठाणे शहर पोलीस दल हादरले आहे.

नवी मुंबईत ५८ रुग्णांची नोंद

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये गरुवारी ५८ रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे रुग्णसंख्या १४२२  झाली आहे. गुरवारी १६ रुग्ण करोनामुक्त झाले. आतापर्यंत  करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ५४८ झाली आहे. दरम्यान, नवी मुंबई महापालिका आयुक्तांनी २२ मे ते ३१ मेपर्यंत प्रतिबंधित क्षेत्र आणि लालश्रेणी क्षेत्र वगळता इतर भागांत अत्यावश्यक सेवांना सूट दिली आहे. त्यामुळे नवी मुंबई हे ठाणे जिल्ह्य़ात प्रतिबंधित क्षेत्र तर संपूर्ण शहर लालश्रेणीमध्ये येत आहे. याठिकाणी विद्युत साहित्य  आणि नळ जोडणी  साहित्याची दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी आहे.

पनवेलमध्ये २५ नवे रुग्ण

पनवेल : पनवेल तालुक्यात गुरुवारी नवे २५ करोनाबाधित आढळले तर दोघांचा मृत्यू झाला. गुरुवारी ३४ जण करोनामुक्त झाले. तालुक्यात आतापर्यंत २२० करोनामुक्त झाले. सध्या तालुक्यात २०९ रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत १७ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रायगड जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील एकूण करोनाबाधितांची संख्या ६२३ असून त्यापैकी पनवेल आणि उरण या दोन तालुक्यांमध्येच ५८० रुग्ण आढळले आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 267 new covid 19 positive patients in thane district zws
First published on: 22-05-2020 at 04:50 IST