कल्याण – बडोदा-जेएनपीटी महामार्गाचे टिटवाळ्या जवळील बल्याणी भागात काम सुरू आहे. या कामासाठी खोदलेल्या पाच ते सहा फुटाच्या जलमय खड्ड्यात पडून शुक्रवारी दुपारी रहमुनिसा रियाझ शेख या तीन वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाला. या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीवर गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा >>> ओपन बुक परीक्षा पद्धतीची राज्य मंडळही करणार चाचपणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बल्याणी येथे मंगळवारपासून शेख पीर वल्ली शाह बाबाचा उरूस सुरू आहे. याठिकाणी संदल निघतो. येथील दर्शनासाठी मीरा भाईंदर येथील रियाझ शेख आपल्या कुटुंबीयांसह टिटवाळ्यात नातेवाईकांकडे आले होते. घरात उरसाचा आनंद होता. दुपारच्या वेळेत रहमुनिसा घराबाहेर खेळताना जवळच महामार्गासाठी खोदून ठेवलेल्या खड्ड्या जवळ गेली. नातेवाईकांकडे तिचे लक्ष नव्हते. खेळताना तिचा तोल जाऊन ती सहा फूट जलमय खड्ड्यात पडली. रहमुनिसा कोठे दिसत नाही म्हणून कुटुंबियांनी घर परिसरात तिचा शोध घेतला. खड्ड्यात एक बालिका तरंगत असल्याचे काही रहिवाशांना दिसले. ती रहमुनिसा असल्याचे आढळले. या घटनेने बल्याणीतील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अशाच प्रकारच्या खड्ड्यात काही महिन्यापूर्वी एका सात वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. चार बालके खड्ड्यात पडून यापूर्वी जखमी झाली आहेत. ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्यांना खड्ड्यांभोवती अडथळे उभे करा सांगुनही ते ऐकत नाहीत, अशी तक्रार रहिवासी झीनत कुरेशी यांनी केली. माजी नगरसेवक मयूर पाटील यांनी ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने हा प्रकार घडल्याचे सांगितले.