डोंबिवली – डोंबिवली जवळील शिळफाटा रस्त्यालगत गोळवली गाव हद्दीत गुरुवारी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत या भागातील ४० भंगाराची दुकाने जळून खाक झाली. विविध प्रकारच्या ज्वलनशील वस्तू या दुकानांमध्ये असल्याने आगीच्या भडक्याबरोबर कानठळ्या बसणाऱ्या वस्तूंचे स्फोट सुरू होते. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

दहा वर्षापूर्वी एका भंगार टॅकरची तोडफोड करताना या भागात भीषण स्फोट झाला होता. मुंबईतील कुर्ला भागातून हटविण्यात आलेले बहुतांशी भंगार विक्रेते शिळफाटा-पनवेल रस्त्यावरील दहिसर-मोरी, २७ गाव हद्दीतील गोळवली भागातील खासगी, सरकारी जमिनीवर येऊन ठाण मांडून बसले आहेत. या भंगार विक्रेत्यांकडून पालिका, स्थानिक संस्थांना कोणत्याही प्रकारे कर मिळत नाही. या भंगार गोदामांमधून लाखो रुपयांची उलाढाल होते. याच भागात जिल्ह्यातील चिंधी बाजार आहे. स्थानिकांच्या आशीर्वादाने हे बेकायदा व्यवहार सुरू आहेत.

हेही वाचा – डोंबिवलीतील फडके रोडवरील पाळणाघरात केंद्र चालकांकडून लहान मुलीचा छळ

गोळवली भागात भंगार दुकानांची बाजारपेठ आहे. याठिकाणी जिल्ह्यातून खरेदी केलेले जुने, खराब झालेले प्लास्टिक, विद्युत उपकरणांची टाकाऊ भाग, गंजलेले रासायनिक टँकर, जुने लोखंड याठिकाणी खरेदी केले जाते. या भंगार वस्तूमधून काही विक्रेते टिकाऊ वस्तू तयार करून त्याची विक्री करतात. शंभरहून अधिक भंगार विक्रीची दुकाने गोळवली परिसरात आहेत.

गुरुवारी मध्यरात्री अचानक एका भंगार गोदामाला आग लागली. दुकानांमधील प्लास्टिक, ज्वलनशील वस्तूंनी पेट घेतल्याने आणि दुकाने पत्रा निवारा, हिरव्या जाळ्यांनी उभारलेली आहेत. त्यामुळे ही दुकाने भराभर पेटत गेली. आग लागताच ज्वलनशील वस्तूंचे स्फोट होऊ लागले. बहुतांशी भंगार विक्रेते कल्याण, डोंबिवली, मुंबई परिसरात राहतात. आग लागल्याचे समजताच ज्या दुकानांमध्ये कामगार झोपले होते. त्यांनी दुकानाबाहेर पळ काढला.

हेही वाचा – अवघ्या काही महिन्यांतच ‘गुलाबी रंग’ उडाला, भारत राष्ट्र समितीचे राज्यातील अस्तित्वच धोक्यात

गोळवली परिसरात ही आग पसरू नये म्हणून स्थानिकांनी टँकरव्दारे आगीवर पाणी मारले. तोपर्यंत अग्निशमन विभागाची कल्याण, उल्हासनगर, एमआयडीसीतून १२ वाहने घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी तातडीने आगीवर पाण्याचे फवारे मारून आग विझविण्याचे प्रयत्न केले. सात तास आग विझविण्याचे काम सुरू होते. आग विझल्यानंतर तिने पुन्हा पेट घेऊ नये म्हणून आग राख शमविण्याचे काम जवानांनी हाती घेतले होते. आगीचे निश्चित कारण समजले नसले तरी शाॅ्र्टसर्किटमुळे आग लागली असण्याची शक्यता अग्निशमन जवान अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.