कल्याण: शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील अज्ञात शिवसेना कार्यकर्त्याने कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयासमोर ‘साहेब मी गद्दार नाही..४० गद्दारांना गाडून त्याच उमेदीने उभे राहू’ अशा आशयाचे फलक सोमवारी लावल्याने खळबळ उडाली. या फलकावरुन शिवसेनेच्या दोन गटात वादाचे प्रसंग उद्भवण्याची चिन्हे दिसू लागताच पालिका आणि पोलिसांनी तात्काळ तो फलक हटविला.

शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवसेनेच्या उध्दव बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शहराच्या विविध भागात फलक लावून शुभेच्छा दिल्या आहेत. डोंबिवली, कल्याण शहराच्या विविध भागात दोन्ही पक्षाच्या शिवसैनिकांनी विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले होते.

शांततेने दोन्ही पक्षांकडून शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीचे कार्यक्रम सुरू असताना, पालिका मुख्यालयासमोर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पक्षातील अज्ञात शिवसैनिकाने ‘साहेब मी गद्दार नाही. गेलेल्या ४० गद्दारांना गाडून पु्न्हा त्याच उमेदीने उभे राहू. तेव्हाच तुम्हाला खऱ्या अर्थाने अभिवादन केले याचे समाधान आमच्या सारख्या शिवसैनिकांना होईल,’ अशा आशयाचा मजकूर असलेला फलक लावला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवसेनेच्या कल्याण शहर शाखेच्यावतीने लावण्यात आलेल्या या फलकाची कल्याण, डोंबिवलीत आणि समाज माध्यमांवर चर्चा सुरू झाली. या फलकावरील मजकुराचा रोख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिशेने असल्याचे समजल्यावर पालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ हालचाल करुन पालिका मुख्यालयासमोरील तो फलक हटविला. तोपर्यंत हा फलक कोणी लावला याची चर्चा सुरू झाली होती. फलक लावणाऱ्या अज्ञात व्यक्तिविरुध्द विद्रुपीकरण आणि दोन गटात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरुध्द पालिका आणि पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.