ठाणे : केंद्र शासनाच्या योजनेतून ४३ नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिरे सुरू केल्याची माहिती ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिल्यानंतर भाजपचे आमदार संजय केळकर यांनी आरोग्यमंदिरांना अचानक भेट देऊन ती बंद असल्याचा पर्दाफाश केला होता. परंतु या आरोग्य केंद्राचे उदघाटन करणाऱ्या शिंदे सेनेच्या स्थानिक माजी नगरसेविका मालती पाटील यांनी थेट केळकर यांच्यावर निशाणा साधत, आरोग्य मंदिराकडे बोट दाखविण्यापेक्षा स्वतःच्या भागातही झोपडपट्ट्यांमध्ये अशी केंद्र उभारण्यासाठी निधी आणा, अशी टीका त्यांनी केली. यामुळे पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेतील जुगलबंदी दिसून येत आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील नागरिकांना घराजवळच मोफत आरोग्य सुविधा मिळावी या उद्देशातून आपला दवाखाना हा प्रकल्प पालिका प्रशासनाने सुरू केला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प होता. ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ अशा नामकरणाने सुरू झालेल्या या दवाखान्याची व्यवस्था सांभाळणाऱ्या ‘मेडऑनगोस’ संस्थेला प्रत्येक रुग्णामागे दीडशे रुपये देण्यात येत होते.

मात्र हा प्रकल्प ठेकेदाराने बंद केल्याचे आणि तिथे कार्यरत असलेल्या डाॅक्टरांसह कर्मचाऱ्यांचे वेतन थकविल्याचा मुद्दा भाजपचे आमदार संजय केळकर यांनी उपस्थित केला होता. यावरून शिंदेच्या शिवसेना आणि भाजपमध्ये वादंग होण्याची शक्यता वर्तविली जात होती. असे असतानाच, बंद पडलेल्या आपला दवाखान्याऐवजी केंद्र शासनाच्या योजनेतून ४३ नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिरे सुरू केल्याची माहिती ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी भाजपचे आमदार संजय केळकर यांना दिली होती. यानंतर आमदार केळकर यांनी कोपरी येथील ठाणे पूर्वेत मीठ बंदर रोड, धोबी घाट आणि बारा बंगला परिसरातील आरोग्य मंदिरांना भेट दिली असता ही मंदिरे बंदच असल्याचे आढळून आले होते. कंटेनरमध्ये ही आरोग्य मंदिरे उभारली असून तिथे उद्घाटनाच्या फिती लोंबकळत आहेत. उद्घाटनाचे बॅनरही दिसत होते. ही मंदिरे बंद असून आजुबाजूला कचरा आणि चिखल अशी दुरावस्था असल्याची माहिती केळकर यांनी दिली होती. तसेच ही ठाणेकरांची फसवणूक असून लवकरच जनआंदोलन उभे करणार असल्याचा इशारा केळकर यांनी दिला होता.

या आरोग्य मंदीराचे शिंदे सेनेच्या स्थानिक माजी नगरसेविका मालती पाटील यांनी केले होते. त्यांनी आमदार केळकर यांच्यावर निशाणा साधत, आरोग्य मंदिराकडे बोट दाखविण्यापेक्षा स्वतःच्या भागातही झोपडपट्ट्यांमध्ये अशी केंद्र उभारण्यासाठी निधी आणा, अशी टीका त्यांनी केली. मी उद्घाटन नाही, भूमिपूजन केले. आपल्या हिंदू संस्कृतीत कोणतेही चांगले काम सुरू करण्यापूर्वी पूजा करणे ही परंपरा आहे. हे चुकीचे कसे ठरू शकते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रयत्नामुळे केंद्र शासनाचा निधी प्रत्यक्ष ठाण्यात पोहोचला आहे. यापूर्वी हा निधी कुठे जात होता, हे सर्वांना ठाऊक नव्हते. पण आज हा निधी योग्य ठिकाणी वापरला जात आहे, याचा मला अभिमान आहे. विकासकामात रस असलेला प्रतिनिधीच निधी खेचून आणू शकतो. चुका दाखवणे सगळ्यांना सोपे आहे, पण प्रत्यक्ष काम करण्यासाठी ध्येय आणि प्रयत्न हवेत. जर आमदार केळकर यांनी मला बोलावले असते, तर मी स्वतः येऊन त्यांना सगळी माहिती दिली असती. हा दवाखाना पुढील आठवड्यात सुरू होणार आहे. जेव्हा अधिकृत उद्घाटन होईल, तेव्हा आम्ही सर्वांना निमंत्रण देऊ. हे आरोग्य केंद्र जनतेच्या हितासाठी उभे राहणार आहे. त्यात राजकारण आणणे चुकीचे आहे, असेही त्या म्हणाल्या.