ठाणे – ठाणे शहरातील उपवन तलावाजवळ विठ्ठलाची ५१ फूट उंच मूर्ती उभारण्यात आली आहे. या मूर्तीचे येत्या ३१ ऑक्टोबर रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. या सोहळ्याला सुप्रसिद्ध समाजप्रबोधनकार ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख(इंदोरीकर) यांचे हरिकीर्तन होणार आहे. त्यामुळे उपवन तलाव परिसरात विशेष सोहळा अनुभवता येणार आहे.

ठाणे शहरातील उपवन तलाव हा एक अत्यंत सुंदर आणि प्रसिद्ध तलाव आहे. उपवन तलाव आणि बाजूला असलेला येऊरचा हिरवागार डोंगर असे मनमोहक दृश्य ठाणेकरांसाठी एक प्रमुख आकर्षण केंद्र ठरत आहे. त्यामुळे या तलावाच्या परिसरात सकाळी आणि संध्याकाळी अनेक लोक फिरायला, धावायला व व्यायामासाठी येतात. याठिकाणी स्वच्छ पायवाटा, बसण्यासाठी आसन व्यवस्था आणि प्रकाशयोजना यामुळे फिरण्यासाठी अत्यंत मनमोहक वातावरण तयार होते.

तसेच तलावाच्या पाण्यावर नुकताच सुरु केलेला ‘लेझर शो’ येथील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे. आता, त्यासह याठिकाणी विठ्ठलाची ५१ फूट उंच मूर्ती साकारण्यात आली आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून उपवन तलाव परिसरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाटाची निर्मिती करण्यात आली होती.आता, त्यांच्याच पुढाकाराने अहिल्यादेवी होळकर घाटावर ही विठ्ठलमूर्ती साकारण्यात आली आहे.

कोल्हापूरचे शिल्पकार सतिश घार्गे यांनी ५१ फूट उंच विठ्ठलाची मूर्ती साकारली आहे. या मूर्तीच्या सभोवती दगडी दीपमाळही उभारण्यात आल्या आहेत. येत्या शुक्रवारी, ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या मूर्तीचे लोकार्पण होणार आहे. तसेच सुप्रसिद्ध समाजप्रबोधनकार ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख(इंदोरीकर) यांचे लोकार्पणाच्या निमित्ताने हरिकीर्तन होणार आहे.