खासगी कंपनी द्वारे भागभांडवल बाजारात(शेअर बाजारात) गुंतवणूक केल्यास दरमहा अधिकचा परतावा देण्याचे सांगून ५४ जणांची तब्बल ९ कोटी १९ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यातील एका गुंतवणूकदारकाने कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे कळवा पोलिसांनी संध्या जैसवाल, प्रफुल जैसवाल, सचिन कैमल आणि पद्मिनी कैमल यांच्या विरोधात आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भागभांडवल बाजारात गुंतवणूक केल्यास अधिकचा परतावा मिळेल, तसेच मोठी रक्कम परकीय चलनात गुंतविल्यास दरमहा चांगला आर्थिक लाभ मिळेल असे सांगून नागरिकांची आर्थिक फसवणूक झाल्याचे प्रकार सातत्याने समोर येत असतात. अशाच पद्धतीने ठाणे, कळवा आणि आसपासच्या परिसरात राहणाऱ्या ५४ नागरिकांची तब्बल ९ कोटी १९ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. यात फसवणूक झालेल्या एका गुंतवणूकदाराने कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार हे कळवा येथील रहिवासी आहेत. त्यांना २०१५ साली त्यांच्या शेजारीच राहणाऱ्या संध्या आणि प्रफुल जैसवाल यांनी त्यांच्या प्रिशा ज्वेलरी डिझायनर आणि प्रिशा इंटरप्रायजेस अशा दोन कंपन्या असल्याचे सांगितले. या दोन कंपन्या भागभांडवल बाजारात गुंतणुकीचा व्यवसाय करतात.

हेही वाचा : डोंबिवली : लोढा हेवन येथील हॉटेलमध्ये दोन वृध्द कामगारांच्या हाणामारीत एकाचा मृत्यू

या कंपनीत गुंतवणूक केल्यास दरमहा चांगला परतावा मिळेल असे सांगितले. तसेच तुमच्या परिचयाच्या व्यक्तींनी देखील यात गुंतवणूक केल्यास त्यांनाही उत्तम परतावा देण्यात येईल असेही त्यांनी तक्रारदार यांना सांगितले. त्यानुसार तक्रारदार आणि त्यांच्या परिचयातील व्यक्तींनी मागील सहा वर्षाच्या कालावधीत लाखो रुपयांची गुंतवणूक केली. सुरवातीचे पाच वर्ष संध्या आणि प्रफुल जैसवाल यांनी गुंतवणूकदारांना दरमहा काही रक्कम परतावा म्हणून दिली. मात्र हि रक्कम परतावा नसून त्यांनी गुंतवणूक केलेल्या रकमेचाच काही भाग असल्याचे संबंधित तक्रारदाराच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी संध्या आणि प्रफुल यांच्याकडे गुंतवणूक केलेली रक्कम आणि दरमहा मिळणारा अधिकचा परतावा याची मागणी केली. मात्र या दोघांनीही उडवाउडवीची उत्तर दिली. या कंपनीत अजून कोणी गुंतवणूक केली आहे याची माहिती घेण्यास तक्रारदाराने सुरवात केली.

हेही वाचा : कल्याण : मोदी सरकारचा अर्थसंकल्प व महागाई या चर्चेतून दोन कामगारांमध्ये तुफान हाणामारी, एक गंभीर जखमी

या दरम्यान सुमारे ५४ लोकांनी एकूण ९ कोटी १९ लाख ३० हजार रुपयांची गुंतवणूक केल्याचे त्यांना समजले. तसेच त्यांना देखील कोणताही परतावा किंवा मूळ रक्कम मिळाली नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी शुक्रवारी संध्याकाळी संध्या जैसवाल, प्रफुल जैसवाल त्यांच्या समवेत असलेले सचिन कैमल आणि पद्मिनी कैमल यांच्या विरोधात कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे कळवा पोलिसांनी चारही जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून याबाबत पुढील तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 54 persons defrauded of rs 9 crores by a private company case registered in kalwa police station in thane tmb 01
First published on: 10-09-2022 at 15:16 IST