केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभेच्या निवडणुका जाहीर केल्यानंतर उमेदवारांची लगबग वाढली आहे. काही पक्षांनी काही जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. तर, जाहीर झालेले उमेदवार आपला उमेदवारी अर्जही भरत आहेत. दरवर्षी प्रमाणे यंदाही अनेकांनी चिल्लर रुपात अनामत रक्कम भरली आहे. बुलढाणा जिल्ह्याचे महा लोकशाही विकास आघाडीचे उमेदवार असलम शाह हसन शाह यांनी १० हजार रुपये चिल्लर रुपात भरली आहे.
आज एका उमेदवाराने डिपॉझिट भरण्यासाठी तब्बल दहा हजार रुपयांची नाणी (चिल्लर) आणली. उर्वरित १५ हजार रुपयांच्या नोटा आणल्या होत्या. त्यांनी दहा हजारांची नाणी अर्जाच्या टेबलावरील कर्मचाऱ्यांसमोर ठेवताच अधिकारी व कर्मचारी थक्क झाले. मात्र, डिपॉझिट रक्कम संदर्भात कोणताही नियम नसल्याने त्यांना १५ हजाराच्या नोटा अन १० हजारांची चिल्लर घेणे बंधनकारक होते. ही रक्कम मोजता मोजता त्यांना ‘एसी’ मध्येही घाम फुटला. या मोजणीला तब्बल ४० मिनिटे लागली. शेवटी मोजणी झाल्यावर त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल केला
महाराष्ट्रात पाच टप्प्यात लोकसभा निवडणूक होणार आहे. तर, पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या पाच मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. या मतदारसंघातील उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेली मुदत संपली आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या आठ जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे. त्यामुळे या मतदारसंघातील उमेदवारांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असताना मंगळवारी (२ एप्रिल) महा लोकशाही विकास आघाडीचे उमेदवार असलम शाह हसन शाह यांनी लोकांकडून देणगी घेऊन १० हजार रुपे भरले आहेत. यामध्ये एक-दोन रुपयांची नाणी आहेत. तर, १५ हजार रुपयांच्या नोटाही आयोगाला दिली आहे.
हेही वाचा >> यवतमाळ : लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवाराने पोतं भरून आणली चिल्लर, पैसे मोजताना कर्मचाऱ्यांची दमछाक
याबाबत असलम शाह हसन शाह म्हणाले, मी महा लोकशाही विकास आघाडीचा बुलढाण्यातील उमेदवार आहे. आता उमेदवारी अर्ज भरून आलो. जनतेकडून वर्गणी घेऊन मी १० हजा रुपयांची चिल्लर निवडणूक आयोगाला दिली आहे. मी समाजासाठी काम करत आहे. तसंच, मुंबई, नागपूर येथे होणारे अधिवेशन, बुलढाण्यातील विविध आंदोलनात मी सहभागी होत असतो.
अपक्ष उमेदवारानेही भरला नाणे देऊन उमेदवारी अर्ज
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार मनोज गेडाम यांनीही काल (सोमवारी) नाणी देऊन उमेदवारी अर्ज भरला. मनोज गेडाम यांनी १२,५०० रुपयांची चिल्लर निवडणूक विभागाकडे सुपूर्द केली होती. हे पैसे मोजण्यासाठी कर्मचाऱ्यांची दमछाक झालेली पहायला मिळाली. त्यामुळे गेडाम यांनी ही रक्कम स्वतः मोजून निवडणूक विभागाकडे सादर करावी, असं सांगण्यात आलं आहे. त्यानंतर गेडाम आणि त्यांच्याबरोबर आलेल्या कार्यकर्त्यांनी ही नाणी मोजून वेगवेगळ्या लहान पिशव्यामध्ये बांधून निवडणूक आयोगाकडे सादर केली.