ठाणे : गेल्याकाही दिवसांपासून विधीमंडळात एक- दोन नव्हे तर तब्बल ७२ अधिकारी हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकल्याच्या चर्चांवरून अधिवेशनात आरोप प्रत्यारोपांच्या फैऱया झटत असताना हा हनीट्रॅपचा केंद्रबिंदूच ठाण्यात असल्याचे समोर आले आहे. पोलीस अधिकाऱ्यांसह शासकीय सेवेतील इतर अधिकाऱ्यांना तिच्या जाळ्यात ओढणारी महिला ठाणे नजीकच्या एका शहरात राहत आहे. आतापर्यंत तिने अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांविरोधात तक्रारी दिल्यानंतर त्या गैरसमजूतीने झाल्याचे नमूद करत मागे घेतल्या आहेत. यामध्ये आयपीएस, उपायुक्त दर्जाच्या अधिकांऱ्यांचा सामावेश आहे. तक्रारीमध्ये सामूहीक बलात्कार, बलात्कार, लग्नाचे अमीष दाखविणे, अश्लील चॅट या सर्वांचा सामावेश आहे. त्यामुळे आता हे प्रकरण आणखी रंगण्याची शक्यता आहे.

राज्यात गेल्याकाही दिवसांपासून हनीट्रॅपचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कारण या हनीट्रॅपच्या जाळ्यात पोलीस अधिकारी, प्रशासकीय अधिकारी असे एकूण ७२ जण अडकल्याचे समोर येत आहे. यामधील ठाणे, मुंबई, नवी मुंबई, नाशिक, पुण्याच्या आजी माजी पोलीस अधिकाऱ्यांचाही सामावेश आहे. मिळालेल्या माहिती नुसार, संबंधित महिलेविरोधात दोन साहाय्यक पोलीस आयुक्तांनी तिच्याविरोधात तक्रार दाखल करुन तिने ४० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. यातील एका साहाय्यक आयुक्तावर तिने कथित सामुहीक बलात्कार केल्याचा आरोप केला होता. ही तक्रार मागे घेण्यासाठी हे पैसे मागितल्याचे कळते आहे. दरम्यान, या प्रकारानंतर संबंधित महिलेच्या जाळ्यात यापूर्वी अनेक पोलीस अधिकारी तसेच इतर विभागातील अधिकारी अडकल्याचे समोर येत आहे. तक्रार अर्ज केल्यानंतर संबंधित महिला अचानक तक्रार गैरसमजूतीतून झाल्याचा दावा करत अर्ज मागे घेत असते.

महिला स्वतःला गरजू महिला पोलीस कॉन्स्टेबल किंवा होमगार्ड असल्याचे भासवून, अनेक आयपीएस अधिकारी, जीएसटी विभागाचे अधिकारी, उत्पादन शुल्क विभाग, महापालिका अधिकाऱ्यांना आकर्षित करून, ब्लॅकमेल करून आणि खोटे आरोप करून मोठी रक्कम उकळत असल्याचे उघड झाले आहे. ती स्वतःला विवाहित महिला, माजी पोलीस कर्मचारी किंवा विधवा असल्याचे सांगून भावनिक कारणाखाली मदतीची विनंती करायची. त्यानंतर ती व्हॉट्सॲवर चॅट, व्हिडिओ कॉल आणि वैयक्तिक भेटींमधून विश्वास संपादन करायची. या भेटीगाठींमध्ये ती गुप्तपणे स्क्रीन रेकॉर्डिंग किंवा हिडन कॅमेऱ्याच्या साहाय्याने अश्लील व्हिडिओ आणि फोटो रेकॉर्ड करायची. त्यानंतर हे व्हिडिओ आणि फोटो सार्वजनिक करून बदनामी करण्याची धमकी देत मोठी रक्कम उकळायची अशी तिची कार्यपद्धती होती अशी माहिती सुत्रांनी दिली.

यापूर्वी झाली होती अटक मुंब्रा शहरातील एका व्यवसायिकाला २०१६ मध्ये ठाण्यात गुन्हे अन्वेषण शाखेची अधिकारी असल्याचे भासवून खंडणी वसूल करण्याच्या प्रयत्नाखाली तिला अटक झाली होती. तिने दीड लाख रुपयांची खंडणी मागितली होती. परंतु तडजोडीअंती २० हजार रुपये देण्याचे ठरले होते. अखेर १० हजार रुपयांचा हप्ता घेताना पोलिसांनी तिला अटक केली. परंतु सुटका झाल्यानंतर तिने हनीट्रॅपच्या माध्यमातून खंडणी उकळण्याचा कारनामा सुरु केला होता.

आयपीएस अधिकारी फसला

एका प्रकरणात, तिने एका आयपीएस अधिकाऱ्याला मदतीच्या बहाण्याने हॉटेलच्या खोलीत बोलावले. तिथं तिने कपडे काढून संपूर्ण प्रकार गुप्तपणे रेकॉर्ड केला आणि नंतर त्याचा वापर खंडणीसाठी केल्याचे कळते आहे.

राज्यातील पोलीस अधिकारी फसले

राज्यातील साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यापासून ते उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांनाही तिने ब्लॅकमेल केले. एका उपायुक्तावर लग्नाचे अमीष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप केला. तर दुसऱ्या एका उपायुक्ताविरोधात फेसबुक, व्हाॅट्सॲपवर अश्लील संदेश पाठवून विनयभंग केल्याप्रकरणी तक्रार अर्ज केला होता. परंतु तडजोड झाल्यानंतर प्रकरणे मागे घेतली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणानंतर राज्यातील प्रशासकीय अधिकारी हनीट्रॅपच्या मोहात कसे बळी पडतात. हा देखील मुद्दा ऐरणीवर आला आहे. आरोपींना पकडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनाच महिलेने हनीट्रॅपच्या माध्यमातून स्वत:च्या जाळ्यात अडकवून ब्लॅकमेल करत आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. त्यामुळे आता पोलीस तसेच इतर प्रशासकीय विभागातील अधिकाऱ्यांमध्ये कुजबूज सुरु झाली आहे.