गेल्या काही दिवसांपासून ठाणे महापालिका क्षेत्रातील इमारतींचे सर्वेक्षण सुरू आहे. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रातील अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतींची यादी तयार करण्याचं काम प्रशासनाकडून केलं जात आहे. त्यानुसार दोन दिवसांपूर्वी झालेल्या कोकण विभागीय आयुक्तांच्या बैठकीत महापालिका प्रशासनाने अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतींची अंदाजे यादी दिली आहे. या यादीनुसार शहरात ७३ अतिधोकादायक तर १७० धोकादायक इमारती असल्याची माहिती पालिकेतील सूत्रांनी दिली आहे. सर्वेक्षणानंतर हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

ठाणे, वागळे इस्टेट, कळवा आणि मुंब्रा या भागात मोठ्या प्रमाणात बेकायदा इमारती आहेत. त्याचबरोबर नौपाडा परिसरातील अधिकृत इमारती मोडकळीस आल्या आहेत. अशा इमारती पावसाळ्यात कोसळून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षात अशा अनेक घटना घडल्या आहेत. अशा घटना टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी शहरातील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण केले जाते. त्यात सी-१, सी-२ए , सी२बी आणि सी३ अशा चार टप्प्यांत धोकादायक इमारतींचे वर्गीकरण करण्यात येते. त्यातील सी-१ म्हणजेच अति धोकादायक इमारतीमधील रहिवाशांचे इतरत्र पुनर्वसन करून त्या इमारतींचे बांधकाम पाडण्यात येते. यंदाही महापालिका प्रशासनाने अशाप्रकारे शहरातील धोकादायक इमारतींची यादी तयार करण्याचं काम सुरू आहे.

सध्या ठाणे महापालिकेतील इमारतींचे सर्वेक्षण करून अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतींची यादी तयार करण्यात येत आहे. हे काम अद्याप पूर्ण झालेलं नाही. २६ एप्रिलला कोकण विभागीय आयुक्तांची नुकतीच एक बैठक पार पडली. यावेळी त्यांनी पालिका क्षेत्रातील अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतींचा आढावा घेतला. महापालिका प्रशासनाने शहरात सुरू असलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतींची अंदाजे यादी दिली आहे. पालिका प्रभाग समितीनिहाय ही यादी देण्यात आली असून यानुसार शहरात ७३ अतिधोकादायक तर १७० धोकादायक इमारती आहेत. विशेष म्हणजे ४५ अतिधोकादायक इमारती एकट्या नौपाडा- कोपरी प्रभाग समिती क्षेत्रात तर मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात सर्वाधिक ८५ धोकादायक इमारती असल्याची माहिती पालिका सूत्रांकडून देण्यात आली आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींचे सी-१, सी-२ ए, सी-२बी आणि सी-३ अशा चार टप्प्यांत वर्गीकरण केले आहे. सी-१ म्हणजे राहण्यास अयोग्य आणि तात्काळ निष्कासित करावी लागणारी अतिधोकादायक इमारत, सी-२ ए म्हणजे इमारत रिकामी करून संरचनात्मक दुरुस्ती करणे, सी-२ बी म्हणजे इमारत रिकामी न करता त्याची संरचनात्मक दुरुस्ती करणे आणि सी-३ म्हणजे इमारतींची किरकोळ दुरुस्ती करणे.

धोकादायक इमारतींची यादी

प्रभाग समितीअतिधोकादायकधोकादायक
नौपाडा कोपरी४५१५
उथळसर
वागळे इस्टेट
लोकमान्य-सावरकर१४
वर्तकनगर१४
माजिवाडा-मानपाडा१३
कळवा१४
मुंब्रा८५
दिवा
एकूण७३१७०