डोंबिवली– मोठ्या लाभाचे आमिष दाखवून गुंतवणुकदारांचा विश्वास संपादन करुन डोंबिवलीतील एका खासगी गुंतवणुकदार कंपनीने येथील सात गुंतवणूकदारांकडून पाच लाख ते १० लाखा पर्यंतच्या रकमा स्वीकारल्या. त्यांना दिलेल्या वेळेत वाढीव परतावा नाहीच, पण त्यांची मूळ गुंतवणूक परत न करता त्या रकमेचा अपहार करुन त्यांची फसवणूक केली आहे.
याप्रकरणी फसवणूक झालेल्या गुंतवणुकदारांनी रामनगर पोलीस ठाण्यात खासगी गुंतवणुकदार कंपनीच्या संचालकां विरुध्द तक्रार केली. पोलिसांनी महाराष्ट्र ग्राहकांचे हितसंबंध कायद्याने गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.
हेही वाचा >>> महाविद्यायीन तरुणीचा लैंगिक छळ करणाऱ्या अंबरनाथच्या तरुणाला अटक ; कल्याण लोहमार्ग पोलिसांची कारवाई
शशिकांत सिताराम नाटेकर (६१, रा. राजपार्क सोसायटी, राजाजी पथ, म्हात्रेनगर, मढवी बंगल्याच्या मागे, डोंबिवली पूर्व) यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अशाच पध्दतीने दीप्ती संजय पिंपुटकर (फसवणूक रक्कम नऊ लाख ५८ हजार), वैशाली संजय पाटील (दोन लाख ४० हजार), लहु नामदेव पांडे (३५ लाख), स्वप्नाली बाविस्कर (१० लाख), मयुरेश रमेश तरे (चार लाख ५० हजार), सैफाली सुनील म्हात्रे (१० लाख) अशी फसवणूक झालेल्या गुंतवणुकदारांची नावे आहेत. तक्रारदार शशिकांत नाटेकर यांची पाच लाखाची फसवणूक झाली आहे.
डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रस्त्यावरील कस्तुरी प्लाझा संकुलातील लोटस (इंडिया वेल्थ) मॅनेजमेंट एलएलपी या कंपनीचे संचालक भाविन देढीया, पियुश शहा, हेनिल महेश देढीया, चेतन गुलाबचंद छेडा, महेश रमेश पाटील, दीपक मधुकर कुंथेकर, गिरीश देढीया यांच्या विरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फेब्रुवारी २०२१ ते १८ ऑगस्ट या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे.
पोलिसांनी सांगितले, तक्रारदार शशिकांत नाटेकर या ज्येष्ठ नागरिकाला लोटस वेल्थ कंपनीचे मालक भाविन देढीया इतर सात संचालकांनी मोठ्या लाभाचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास सांगितले. तत्पूर्वी शशिकांत यांचा विश्वास संपादन केला. त्यांना लोटस वेल्थ कंपनीतील गुंतवणूक योजनेत पाच लाख रुपये गुंतवणूक करण्यास सांगितले. या रकमेवर शशिकांत यांना मासिक नफा आणि मूळ मुद्दल रकमेतील तीन लाख ५० हजार रुपये परत करणे आवश्यक होते. परंतु, गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत लोटस वेल्थच्या संचालकांनी विविध कारणे देऊन शशिकांत यांना वाढीव नफा, मूळ मुद्दल रकमेतील रक्कम परत केली नाही. अशाच पध्दतीने इतर सात गुंतवणुकदारांनी लाखो रुपयांच्या रकमा संचालकांच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन गुंतविल्या आहेत. हे गुंतवणुकदार दररोज लोटस कंपनीत येऊन वाढीव नफा, मूळ मुद्दल परत करण्याची मागणी संचालकांकडे करत आहेत. परंतु, वेळोवेळी वेळकाढू कारणे देऊन संचालकांनी गुंतवणुकदारांना परतून लावले. दीड वर्षात आपणास आपल्या रकमा परत मिळत नसल्याने संचालकांनी आपली फसवणूक केली आहे. हे लक्षात आल्याने गुंतवणुकदारांनी शशिकांत नाटेकर यांच्या पुढाकाराने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे. जमा केलेली रक्कम आरोपी संचालकांनी स्वताच्या फायद्याकरीता वापरुन त्याचा अपहार केल्याचा गुंतवणुकदारांचा आरोप आहे.