ठाणे – विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या कलागुणांना वाव मिळावा तसेच त्यांच्यात आत्मविश्वास वाढावा यासाठी जिल्हास्तरावर ‘क्वालिटी समर फनकॅम्प’ हा उपक्रम राबविण्यात आला होता. या उपक्रमांतर्गत नुकतेच विद्यार्थी गुणवत्ता जागरुकता कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत जिल्हा परिषद शाळांमधील ८०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. विविध सत्रांमधील परस्परसंवादी आणि सर्जनशील घटकांमुळे शिक्षण किती आकर्षक तसेच आनंददायी असू शकते, हे विद्यार्थी आणि शिक्षकांना या कार्यशाळेत प्रत्यक्ष अनुभवता आले, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली.
ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ व्हावी यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या संकल्पनेतून कृत्रीम बुद्धिमत्तेचा वापर करुन दिशा प्रकल्प राबविला जात आहे. असे असतानाच आता, राष्ट्रीय गुणवत्ता प्रोत्साहन मंडळ (नॅशनल बोर्ड ऑफ क्वालिटी प्रमोशन) आणि भारतीय गुणवत्ता परिषद (क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया) यांच्या वतीने “क्वालिटी चॅम्पियन्स : स्मॉल स्टेप्स, बिग इम्पॅक्ट” या संकल्पनेवर आधारित “क्वालिटी समर फनकॅम्प” हा उपक्रम राबविण्यात आला होता. या उपक्रमांतर्गत, १६ ते १८ जुलै या कालावधीत ठाणे जिल्ह्याच्या पाच तालुक्यातील प्रत्येकी एका जिल्हा परिषदेच्या शाळेत गुणवत्ता जागरूकता कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आदर्श जिल्हा परिषद शाळा खर्डी ( शहापूर), जिल्हा परिषद शाळा बळेगाव (मुरबाड), जिल्हा परिषद शाळा मामनोली (कल्याण), जिल्हा परिषद शाळा वसार (अंबरनाथ) आणि जिल्हा परिषद शाळा पूर्णा (भिवंडी) या शाळांमधील ८०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता, अशी माहिती ठाणे जिल्हा शिक्षण विभागाकडून देण्यात आली. ठाणे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी संपूर्ण कार्यशाळेचे नियोजन व संनियंत्रण केले. तर, आशिष झुंजारराव आणि भरत वेखंडे यांनी समन्वय ठेऊन ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.
विद्यार्थ्यांना जीवन कौशल्यासह व्यावहारिक धडे
या कार्यशाळेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच जीवनातील विविध पैलूंमध्ये गुणवत्तेचे महत्त्व समजावून देणे हा होता. कार्यशाळांमध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक जीवन कौशल्ये प्रदान करण्यात आली. तसेच दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या व्यावहारिक आणि दर्जेदार साधनांची ओळख करून देण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधता येईल, असे शिक्षण विभागाने सांगितले.या कार्यशाळेचे आयोजन भारतीय गुणवत्ता परिषद (क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया) च्या पथकाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या उपक्रमासाठी रश्मी महेला, स्वाती, आणि कशीश काला यांनी विशेष प्रयत्न केले, तसेच त्यांच्यासोबत विशेष मास्टर ट्रेनर्सची टीमही सहभागी होती.