डोंबिवली – कल्याण डोंबिवली पालिक हद्दीत ८० ते ९० हजार भटके श्वान आहेत. मागील तीन वर्षाच्या कालावधीत ४८ हजार ४३७ भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण करण्यात आले आहे. याच कालावधीत ५१ नागरिकांना विविध भागात श्वान दंश झाले आहेत. मागील तीन वर्षाच्या कालावधीत कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनातील आरोग्य विभागाने भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण आणि लसीकरणावर एकूण चार कोटी २३ लाख ८४ हजार ५८४ रूपये खर्च केले आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने माहिती अधिकारात दिली आहे.

कल्याण डोंंबिवली पालिका हद्दीतील भटक्या श्वानांची वाढती संख्या विचारात घेऊन पालिका प्रशासन या श्वानांचे निर्बिजीकरण, लसीकरण आणि त्यांचा निवारा याविषयी काय सुविधा पुरवते. यासाठी किती खर्च करते याची माहिती डोंबिवलीतील जागरूक नागरिक विवेक पाठक यांनी पालिकेच्या आरोग्य विभागाकडे मागितली होती. आरोग्य मुख्यालयातील अधीक्षक अनिता राठोड यांनी ही माहिती दिली आहे.

या माहिती अधिकारातील माहिती अशी, कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत ८० ते ९० हजार भटके श्वान आहेत. मागील तीन वर्षात जुलै २०२५ पर्यंत पालिकेच्या पत्रीपूल सर्वोदय माॅल समोरील निर्बिजीकरण केंद्रात ४८ हजार ४७३ भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण करण्यात आले. सन २०२२ ते जुलै २०२५ या कालावधीत पालिका हद्दीत ५१ हजार ५१ नागरिकांना भटके श्वान चावले. मागच्या तीन वर्षात रेबिज श्वान दंशाची एक हजार १७६ प्रकरणे आढळली. मागच्या तीन वर्षात ४८ हजार ४७३ भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण करण्यात आले.

कल्याण मधील पत्रीपुलाजवळील सर्वाेदय माॅल समोरील निर्बिजीकरण केंद्रात भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण केले जाते. प्रशासन आणखी दोन केंद्रे डोंबिवली किंवा टिटवाळा येथे सुरू करण्याच्या विचारात आहे, असे माहिती अधिकारातील माहितीत म्हटले आहे.

भटक्या श्वानांच्या निर्बिजीकरण आणि लसीकरणावर मार्च २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत एक कोटी ५१ लाख ६४ हजार ३३७ रूपये, एप्रिल २०२३ ते ते मार्च २०२४ या कालावधीत एक कोटी ४१ लाख ६२ हजार ४८०, एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत एक कोटी ३० लाख ५७ हजार ७६७ रूपये खर्च करण्यात आले आहेत. शहरातील प्राणीप्रेमी नागरिक भटक्या श्वानांना उघड्यावर खाऊ घालतात. यावर कोणताही प्रतिबंध नाही, असे माहितीत म्हटले आहे. भटक्या श्वानांना खाऊ घालण्यावरून काही वाद निर्माण झाला तर हा विषय राज्य प्राणी संवर्धन मंडळातर्फे मार्गी लावला जातो. पत्रीपूल येथील पालिकेचे श्वान शस्त्रक्रिया, निर्बिजीकरण, लसीकरणाचे काम पुण्याची मे. जीवरक्ष ॲनिमल वेल्फेअर ट्रस्ट करत आहे.

पालिकेच्या निर्बिजीकरण केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. त्यामुळे श्वानांच्या किती शस्त्रक्रिया झाल्या याची अचूक प्रत्यक्षदर्शी माहिती मिळत नाही. केवळ निधी संपविण्यासाठी खर्चाचे मोठे आकडे दाखवून देयक काढण्याची कामे आरोग्य विभाग करत आहे. या केंद्रातील कारभार, वित्त विभाग, आरोग्य विभागाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.- मनोज कुलकर्णी,माहिती कार्यकर्ते.