99 heirs of farmers who had given land for Barvi Dam were appointed thane kalyan news ysh 95 | Loksatta

बारवी धरणासाठी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांच्या ९९ वारसांना कडोंमपात पदस्थापना

मुरबाड जवळील बारवी धरणासाठी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांच्या ९९ वारसांना कल्याण डोंबिवली पालिकेच्या सेवेत शासन आदेशानुसार नियुक्त्या देण्यात आल्या.

बारवी धरणासाठी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांच्या ९९ वारसांना कडोंमपात पदस्थापना
कल्याण डोंबिवली पालिकेत नियुक्त झालेल्या बारवी धरण प्रकल्प बाधितांनी मुरबाडचे आ. किसन कथोरे यांची भेट घेऊन समाधान व्यक्त केले. (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

कल्याण: मुरबाड जवळील बारवी धरणासाठी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांच्या ९९ वारसांना कल्याण डोंबिवली पालिकेच्या सेवेत शासन आदेशानुसार नियुक्त्या देण्यात आल्या. अनेक वर्ष हा प्रकल्पग्रस्तांचा विषय प्रलंबित होता. प्रकल्पग्रस्तांनी हक्काची नोकरी मिळण्यासाठी अनेक वर्ष शासन पातळीवर लढा दिला होता. अखेर त्या लढ्याला यश आले आहे.

मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी बारवी धरणासाठी जमिनी दिलेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या वारसाला नोकरी देण्यासाठी शासन बांधिल आहे. त्यांची हक्काची नोकरी त्यांना दिली नाही तर यापुढील काळात शासनाच्या कोणत्याही प्रकल्पासाठी शेतकरी जमिनी देण्यासाठी पुढे येणार नाहीत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. मागील अनेक वर्षापासून बारवी धरण प्रकल्पग्रस्त नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत. त्यांना आश्वासना व्यतिरिक्त कोणतीही हमी मिळत नाही, असेही आ. कथोरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना सांगितले होते. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी अनेक वर्ष रेंगाळलेला हा महत्वपूर्ण विषय मार्गी लावला आहे.

हेही वाचा >>> Maharashtra News Live : भाजपाला मतांसाठी शिवराय हवेत, बाळासाहेब थोरातांची टीका

बारवी धरणाचे पाणी ज्या महापालिका, नगरपालिका उचलतात. त्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील महापालिकांनी बारवी धरण प्रकल्पबाधितांना त्यांच्या आस्थापनेप्रमाणे सामावून घ्यावे असे आदेश शासनाने दिले होते. शासन आदेशाप्रमाणे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने ११९ प्रकल्पबाधिताना कल्याण डोंबिवली पालिकेने भरती करुन घ्यावे म्हणून आदेशित केले होते. या आदेशाप्रमाणे कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने मागील पाच ते सहा महिन्यात प्रकल्प बाधित उमेदवारांची कागदपत्रांची सत्यता, वैद्यकीय तपासणी, चारित्र्य पडताळणी अहवाल, पोलीस अहवाल या सर्वांची पूर्तता करुन ९९ पात्र उमेदवारांना कल्याण डोंबिवली आस्थापनेवर विविध विभागात शैक्षणिक पात्रतेप्रमाणे पदस्थापना दिली आहे.

हेही वाचा >>> कल्याणमध्ये सिलिंडरमधून गळती होऊन घराला आग; दोन महिला जखमी

या पदस्थापनेत विद्युत तांत्रिकी, शिक्षक, लिपीक, सुरक्षा रक्षक, टंकलेखक, शिपाई, बहुद्देशीय कामगार, सामाजिक कामगार विभाग कनिष्ठ अभियंता यांचा समावेश आहे. उर्वरित प्रकल्पबाधितांच्या कागदपत्रांची छाननी केल्यानंतर त्यांना पदस्थापना देण्यात येणार आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. ठाणे, भिवंडी, वसई-विरार, मिरा-भाईंदर, नवी मुंबई पालिकांमध्ये प्रकल्पबाधितांना पदस्थापना देण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> भिवंडीत थकबाकीदारांवर कर सवलतींचा वर्षाव

तसेच, आस्थापना सुचीवरील मंजुर व रिक्त सफाई कामगार पदावरील वारसा हक्काने नियुक्त होणाऱ्या १४ कामगारांना अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आली. नियुक्त झालेल्या सर्व कामगारांनी आ. किसन कथोरे यांची बदलापूर येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन केलेल्या पाठपुरावा आणि नियुक्तीबद्दल समाधान व्यक्त केले.

“बारवी धरणासाठी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना शासन सेवेत सामावून घ्यावे म्हणून आपण अनेक वर्षे शासनाकडे पाठपुरावा करत होतो. त्या प्रयत्नांना आता यश आले आहे.”

किसन कथोरे, आमदार मुरबाड

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 16:49 IST
Next Story
भिवंडीत साडे पाच लाख रुपयांचा गुटखा जप्त