कल्याण – विकसित करण्यात येत असलेल्या जागेत बेकायदा घुसून नुकसान केल्याचा आरोप एका बांधकाम व्यावसायिकाने केला असून याप्रकरणी त्याने दिलेल्या तक्रारीच्या आधारे शुक्रवारी हिललाईन पोलिसांनी शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड, त्यांचे समर्थक आणि व्दारलीतील इतर ७० ग्रामस्थांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. या दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत पोलिसांनी कमालीची गुप्तता बाळगली होती, परंतु गोळीबाराच्या घटनेनंतर रविवारी या दाखल गुन्ह्याचे प्रकरण बाहेर आले.

कल्याण पश्चिमेतील बांधकाम व्यावसायिक जितेंद्र रामअवतार पारीख (३७) याच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. ते व्हर्टेक्स स्काय व्हिला या बांधकाम कंपनीचे संचालक आहेत. कल्याण पश्चिमेतील वायलेनगर भागात ही कंपनी आहे. कल्याण पूर्वेतील भाजप आमदार गणपत गायकवाड या बांधकाम कंपनीशी संबंधित आहे, असे समजते. या प्रकरणात शिवसेनेचे कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड, अक्षय दिनेश गायकवाड, राहुल पाटील, किरण फुलोरे, एकनाथ जाधव, सुनील जाधव आणि इतर ७० लोक यांचा समावेश आहे. आरोपींमध्ये तीन महिलांचा समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचा >>>छत्तीसगड येथील चार वेठबिगारांची ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने सुटका

हिललाईन पोलिसांनी सांगितले, तक्रारदार जितेंद्र पारीख, भागीदार प्रमोद रंका यांचे व्दारली येथे भागीदारी पध्दतीन जमीन विकसित, गृह प्रकल्प विकसित करण्याचे काम प्रस्तावित आहे. खरेदी विक्री व्यवहाराने ही जमीन भागीदारांनी कब्ज्यात घेतली आहे. या जागेत व्दारली गावातील ७० ग्रामस्थांसह शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड आपल्या साथीदारांसह तक्रारदारांच्या मालकी हक्काच्या जागेत बेकायदा घुसले. तेथील सुरक्षा रक्षकांनी या मंडळींना रोखले. त्यास दाद न देता त्यांनी तक्रारदारांच्या जागेत जबरदस्तीने प्रवेश केला. या जागेवर आमचा कब्जा असल्याचे सांगून ती जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. तेथील कामगारांना दमदाटी, शिवागीळ करून तेथील काम बंद पाडले. बांधकामाच्या ठिकाणी बांधलेली संरक्षित भिंत जमावाने तोडली. लोखंडी खांब उपटून फेकून दिले. बेकायदा जमाव जमवून तक्रारदार जितेंद्र पारीख यांच्या जागेत घुसखोरी केल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा >>>तर मी उद्धव सेनेत जायला तयार – आमदार शहाजी पाटील

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोळीबाराची रुजवात

व्दारली येथील जमीन मालक एकनाथ जाधव यांच्याशी जमीन व्यवहार करूनही ते जमिनीचा ताबा देत नाहीत म्हणून भागीदार संस्थेसह या कंपनीशी संबंधित आमदार गणपत गायकवाड अस्वस्थ होते. त्यांनी जमीन मालकाला जमिनीचा ताबा देण्याचे, विकास करार करण्याची सातत्याने मागणी केली होती. परंतु, जमीन मालकाला शहरप्रमुख महेश गायकवाड भडकवित असल्याचे आमदार गायकवाड यांचे म्हणणे आहे. अखेर न्यायालयातून जमिनीचा ताबा घेण्यासाठी आमदार गायकवाड यांनी आदेश आणला होता. त्यालाही मालक दाद देत नव्हता. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आमदार गायकवाड एकनाथ जाधव यांच्या जमिनीचा ताबा घेतील, असे वाटल्याने महेश यांनी ७० ग्रामस्थांसह सहकाऱ्यांना जाधव यांच्या जागेत जबरदस्तीने घुसविले. तेथे दांडगाई केली. तेथील काम बंद पाडले. म्हणून आमदार गायकवाड यांचा मुलगा वैभव हिललाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आला होता. आपल्या विरूध्द वैभव खोटी तक्रार करील म्हणून महेश साथीदारांसह हिललाईन पोलीस ठाण्यात आला होता. वैभवला पोलीस ठाण्यात पाहून महेशच्या साथीदारांनी त्याला पोलीस आवाराच्या बाहेर मारहाण केली. ही माहिती आमदार गायकवाड यांना समजली. तेही पोलीस ठाण्यात आले. दोन्ही गटांना समोर बसून हा प्रश्न सोडविण्याचा पोलिसांचा प्रयत्न होता. पोलीस आवारातील दोन्ही गटांना शांत करण्याचे प्रयत्न करत होते. त्यानंतर अधिकाऱ्याच्या दालनात आमदारांनी गोळीबार करून महेश यांच्यासह सहकाऱ्यावर गोळीबार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.